सांगली : वसंतदादा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत खा. विशाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली २१ संचालकांची बिनविरोध निवड झाली. कारखान्याची सूत्रे आता वसंतदादांचे चौथ्या पिढीतील वारसदारांकडे जाण्याची चिन्हे असून, माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील यांचे चिरंजीव हर्षवर्धन पाटील यांचा कारखान्याचे संचालक म्हणून राजकीय प्रवेश झाला आहे.

साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या २१ जागासाठी १०३ उमेदवारी अर्ज रिंगणात होते. उमेदवारी अर्ज माघारीची मंगळवारी अंतिम मुदत होती. गेल्या तीन दिवसांत खा. पाटील यांनी इच्छुकांशी संवाद साधून इच्छुक उमेदवारांशी चर्चा करून कारखाना निवडणूक अविरोध होण्यासाठी प्रयत्न केला. या प्रयत्नाला यश येऊन मंगळवारी उमेदवारी माघारीची मुदत संपण्यापूर्वी ८२ जणांनी माघार घेतल्याने संचालक मंडळाच्या २१ जागांसाठी २१ उमेदवार उरल्याने अखेर ही निवडणूक अविरोध झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी गोपाळ माळवे यांनी मंगळवारी सायंकाळी जाहीर केले.

कारखान्याचे अविरोध निवड झालेले संचालक असे- दादासो पाटील कळंबी, दिनकर साळुंखे माधवनगर, हर्षवर्धन पाटील साखर कारखाना, दौलतराव शिंदे म्हैसाळ, शिवाजी कदम शिरढोण, तानाजी पाटील खंडेराजुरी, संजय पाटील कवठे पिरान, ऋतुराज सूर्यवंशी अंकलखोप, विशाल चौगुले कसबे डिग्रज, यशवंतराव पाटील भिलवडी, गणपतराव सावंत-पाटील सावंतपूर, अमित पाटील येळावी, अंकूश पाटील बोरगाव, उमेश मोहिते मांजर्डे, गजानन खुजट तासगाव, विशाल पाटील साखर कारखाना, विशाल चंदूरकर कवठेएकंद, सुमित्रा खोत हरिपूर, शोभा पाटील म्हैसाळ, अंजूम महात सांगली आणि प्रल्हाद गडदे ब्रह्मनाळ.

वसंतदादा पाटील यांचे वारसदार प्रकाश बापू पाटील व माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील यांनी कारखाना अध्यक्ष म्हणून काम केले होते. सध्या खा. पाटील हे कारखान्याचे अध्यक्ष असून, त्यांनी दहा वर्षे कारखान्याच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळली आहे. खा. पाटील यांच्या सोबत आता प्रतीक पाटील यांचे चिरंजीव हर्षवर्धन पाटील यांची संचालक म्हणून निवड झाली असून, ते वसंतदादा घराण्यातील चौथ्या पिढीचे वारसदार आहेत. खा. पाटील यांच्यानंतर त्यांच्याकडे कारखान्याच्या अध्यक्षपदाची सूत्रे जाण्याची चिन्हे आहेत.

Story img Loader