सांगली : कत्तलीसाठी जनावरे नेत असताना गोरक्षकांचा पाठलाग चुकविण्याच्या प्रयत्नात वाहनाचा अपघात होऊन पाच वासरांचा मृत्यू घडण्याची घटना सोमवारी पहाटे सावळी येथे तासगाव फाट्यावर घडली. अपघातानंतर चालकाने पलायन केले. मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
याबाबत माहिती अशी की, कर्नाटकातून बोलेरो पिकअप वाहनातून (एमएच १३ एएन ५८८६) कत्तलीसाठी जनावरांची वाहतूक करण्यात येत असल्याची माहिती गोरक्षकांना मिळाली होती. यामुळे गोरक्षक या वाहनांचा पाठलाग करत होते. ही जनावरे सोलापूरला नेण्यात येत असल्याची माहिती मिळाली होती. गोरक्षकांचा पाठलाग चुकविण्याच्या प्रयत्नात असताना बोलेरो पिकअपने समोरून जात असलेला मालट्रक (केए २७ बी ७७२५) यास धडक दिली. यामुळे पिकअप वाहन पलटी झाले. या अपघातात संकरित गायीच्या पाच वासरांचा जागीच मृत्यू झाला. तर ३१ वासरे जखमी झाली होती.
या अपघातानंतर चालकाने पलायन केले असून, जखमी वासरांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. वाहनात ३६ वासरांच्या तोंडाला चिकटपट्टी लाऊन दोरीने दाटीवाटीने वाहनांत ठेवण्यात आले होते. जनावरांना चारा पाणी न देता योग्य त्या वैद्यकीय अधिकारीकडून वाहतुकीचा परवाना न घेता या जनावरांची कत्तलीसाठी वाहतूक करण्यात येत असल्याचे प्रथमदर्शनी आढळल्याने पोलिसांनी टेम्पो चालकाविरुद्ध मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात प्राण्याचा छळ प्रतिबंधक अधिनियमान्वये गुन्हा दाखल केला आहे.