विवाह झाल्यानंतरही प्रियकरापासून दुरावलेल्या नवविवाहित युवतीने माहेरी विष प्राशन करुन आत्महत्या केली. तर, याच वेळी या युवतीच्या प्रियकरानेही आत्महत्या केली. जत तालुक्यातील एकुंडी गावात सोमवारी हा प्रकार घडला.

एकुंडी येथील तरुणीचे गावातील तरुणावर प्रेम होते. दोघांनी लग्न करून एकत्र राहण्याची निर्णय घेतला होता. मात्र घरातील लोकांचा विरोध होता. मुलीचे लग्न झाल्यावर दोघेही एकमेकांना विसरून जातील असा विचार करून, तरुणीच्या घरच्यांनी तिचा एक जून रोजी सलगरे ( ता. मिरज) येथील तरुणाशी विवाह लावून दिला. मात्र तरुणीला हा विवाह मान्य नव्हता.

विवाहानंतर पाचव्याच दिवशी रविवारी माहेरी आलेल्या या तरुणीचा व तिच्या प्रियकराचा फोनवर संपर्क झाला. यानंतर दोघांनी जीवन संपविण्याचा निर्णय घेतला. दोघांनी एकाच वेळी आप-आपल्या घरात विषारी औषध प्राशन केले. ही घटना कुटुंबातील लोकांच्या लक्षात आल्यानंतर उपचारासाठी प्रयत्न झाले. मात्र उपचार करण्यापुर्वीच दोघांची जीवनयात्रा संपली. याबाबत जत पोलीस ठाण्यात आकस्मिक मयताची नोंद करण्यात आली आहे.