सांगली : लग्नाच्या वरातीत ध्वनीवर्धकांच्या भिंतीसमोर नाचत असताना एका तरुणाचा पूर्ववैमनस्यातून खून करण्याचा प्रकार रविवारी रात्री खंडेराजुरी (ता. मिरज) येथे घडला. रंगपंचमी दिवशी रंग लावण्यावरून झालेल्या वादावादीतून झालेल्या या खूनप्रकरणी चार संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून दोघेजण फरार झाले आहेत.
खंडेराजुरी येथे रविवारी रात्री सुमित धनसरे याच्या लग्नाची वरात काढण्यात आली होती. मध्यरात्री वरातीत आवाजाच्या भिंतीपुढे काही तरुण बेभान होऊन गाण्याच्या तालावर नृत्य करत असतानाच सुमित जयंत कांबळे (वय २१) याच्यावर चाकूने हल्ला करण्यात आला. चाकूने भोकसल्याने तो वरातीतच खाली कोसळला. मात्र, ध्वनीवर्धकांच्या आवाजात त्याचा ओरडण्याचा आवाजच लवकर कुणाच्या लक्षात आला नाही. काही वेळाने तो खाली कोसळल्यावर वरातीमध्ये धावपळ झाली. तोपर्यंत वर्मी वार बसल्याने सुमितचा जागीच मृत्यू झाला होता.
हेही वाचा – उद्धव ठाकरेंना ‘ती’ पत्रकार परिषद भोवणार? केंद्रीय निवडणूक आयोगाकडून कारवाईचे आदेश
या खूनप्रकरणी सूरज आठवले, अतुल वायदंडे, शरद ढोबळे, आकाश कांबळे या चार संशयितांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. रंगपंचमीवेळी आठवले आणि मृत सुमित यांच्यात रंग लावण्यावरून वाद झाला होता. या वादातच आठवले याने बघून घेण्याची धमकी दिली होती. त्यातून रात्री वरातीमध्ये आठवले आणि त्याच्या सहकार्यांनी जाब विचारून चाकूने भोकसले असल्याचे सांगण्यात आले.
हेही वाचा – जान्हवी कपूरच्या चाहत्याने ‘मिस्टर ॲण्ड मिसेस माही’ चे १८ खेळ केले बूक
या घटनेनंतर चार संशयितांना पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतले असले तरी दोघे पसार झाले आहेत. या प्रकरणातील प्रमुख संशयित आठवले हा मूळचा खिद्रापूरचा रहिवासी असून तो आजोळी वास्तव्यास आहे. यापूर्वी गणेशोत्सव मिरवणुकीवेळीही त्याने मारामारीचा प्रकार केला होता. गुन्हेगारी वृत्तीच्या आठवले विरुद्ध गर्दी, मारामारीचे गुन्हे पोलीस ठाण्यात दाखल आहेत.