गलीतील कवठे महाकाळ गावची कुणीएक सविता पाटील ‘कोण होईल मराठी करोडपती’च्या हॉट सीटवर बसते. तिच्यापुढे अनेक स्वप्नं आहेत आणि तरीही हॉट सीटवर बसून खेळताना डोळ्यासमोर एक कोटी रूपये मिळाले तर?, या प्रश्नाबरोबर स्वप्नं तरळत नाहीत. तर करायच्या अशा अनेक गोष्टींची यादी अगदी मनात ठरवल्याप्रमाणेच समोर उलगडते. या अडचणींतून बाहेर पडण्यासाठी का होईना ज्ञानकुंभातून मिळणारा पै न् पै जिंकायचा आहे, असे ध्येय मनाशी बाळगलेल्या सविता पाटील यांनी या खेळात पंचवीस लाख रुपये जिंकले आहेत. ‘केबीसी’चा मराठी अवतार असलेल्या ‘कोण होईल मराठी करोडपती’ या शोच्या त्या पहिल्या लखपती ठरल्या आहेत.
पंचवीस लाख जिंकलेल्या सविता पाटील यांच्यापुढे असणाऱ्या अडथळ्यांची रांग फार मोठी आहे. कवठे महाकाळ येथे शिक्षिका म्हणून कार्यरत असलेल्या २९ वर्षांच्या सविता पाटील यांची कहाणी तितकीच संघर्षमय आहे. विज्ञान शाखेच्या पहिल्या वर्षांचे शिक्षण घेत असतानाच त्यांचा विवाह झाला. लग्नानंतर शिकायचे नाही, असे बंधन सासरच्यांनी घातल्यामुळे त्यांचे शिक्षण अर्धवट झाले. अखेर, आईच्या मदतीने लपून-छपून शिक्षण घेत त्यांनी कलाशाखेचे पहिले वर्ष पूर्ण केले. त्यांची शिकण्याची जिद्द लक्षात आल्यानंतर पतीकडून त्यांना शिक्षणासाठी हिरवा कंदील मिळाला. आणि त्यांनी पदवीपर्यंत शिक्षण घेतले. मग डी. एड पूर्ण के ले. स्वत: जिद्दीने शिक्षण पूर्ण करणाऱ्या सविता पाटील यांना  ‘कोण होणार मराठी करोडपती’मध्ये जिंकलेल्या पंचवीस लाख रूपयांमधून आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी तरतूद करायची आहे. त्यांच्या पतीच्या ह्रदयात छिद्र आढळून आले असल्याने त्यांच्यावर तातडीने उपचार करायचे आहेत. शिवाय, त्यांना स्वत:लाही अल्सर असल्याने उपचारांचा खर्च मोठा आहे. ‘या अडचणीतून बाहेर पडून मला माझ्या मुलांच्या शिक्षणासाठी आणि त्यांच्या भविष्यासाठी ‘कोण होईल मराठी करोडपती’मधून मिळालेल्या पैशांची निश्चित मदत होणार आहे,’ असा विश्वास सविता पाटील यांनी व्यक्त केला.  

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा