सांगली : प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी केंद्रिय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांना काळे झेंडे दर्शविण्याचा निर्णय कृती समितीने गुरुवारी झालेल्या बैठकीत धेतला आहे. गडकरी हे ४ ऑक्टोबर रोजी सांगली दौऱ्यावर येत असून या वेळी हे आंदोलन करण्यात येणार आहे. या प्रस्तावित महामार्गामुळे बागायती शेती बाधित होत असून या मार्गाची गरज नसल्याने हा मार्ग रद्द करण्यात यावा या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे.

या महामार्गामुळे जिल्ह्याच्या १९ गावांतील पिकाऊ जमीन बाधित होणार असून, महापुराचा धोकाही वाढणार आहे. यामुळे जिल्ह्यातून या महामार्गाला विरोध होत आहे. मात्र, याबाबत वेगवेगळे निर्णय झाल्याचे जाहीर करण्यात येत आहेत. एकीकडे मुख्यमंत्री या महामार्गाला नांदेड व कोल्हापूरचा विरोध असल्याचे सांगत आहेत, तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार हे याला कुणाचा विरोध असेल तर महामार्ग केला जाणार नाही, असे सांगत आहेत. यामुळे बाधितांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून याबाबत स्पष्टता सरकारकडून होणे गरजेचे आहे, असे मत कृती समितीने व्यक्त केले आहे.

हेही वाचा >>>Nadurbar : नंदुरबारमध्ये धार्मिक रॅलीवर दगडफेक, दोन गटांमध्ये तणाव, पोलिसांनी केलं ‘हे’ आवाहन

या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी केंद्रिय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या ४ ऑक्टोबरच्या दौऱ्यावेळी काळे झेंडे दाखविण्यात येणार आहेत. तसेच २५ सप्टेंबर रोजी सरकारचे श्राद्ध घालण्यात येणार असून यावेळी सुमारे एक हजार जणांना जेवण घालून निषेध करण्यात येणार असल्याचे समितीच्यावतीने सांगण्यात आले. या बैठकीस उमेश देशमुख, सतीश साखळकर, प्रभाकर तोडकर, सुनील पवार, उमेश एडके, विष्णु पाटील, अभिजित जगताप आदी उपस्थित होते.