राज्यात शिंद गट-भाजपा यांचे संयुक्त सरकार स्थापन होण्याअगोदर शिवसेना पक्षात मोठी फूट पडली. शिवसेनेचे ४० आमदार थेट गुवाहाटी येथे गेले. दरम्यान, येथे सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील त्यांच्या डायलॉगबाजीमुळे चांगलेच प्रसिद्ध झाले. त्यांच्या ‘काय झाडी….काय डोंगार….काय हाटेल’ या डायलॉगमुळे संपूर्ण महाराष्ट्राला वेड लागले. त्यांच्या या डायॉलगवर चक्क गाणीदेखील निघाली. मात्र आता त्यांच्या मतदारसंघातील शेतकऱ्यांनी ‘काय ते रेल्वे…..काय ते डीआरएम…’ अशी डायलॉगबाजी करत शहाजी पाटलांना घरचा आहेर दिला आहे.
सोलापुरात शेतकऱ्यांनी रेल्वे प्रशासन तसेच शहाजी पाटील यांच्याविरोधात नाराजी व्यक्त केली. किसान रेल्वे बंद झाल्याने सांगोला येथील शेतकऱ्यांचा शेतीमाल खराब होत आहे. शेतीमाल वेळेवर पोहोचवण्यासाठी शेतकऱ्यांना वाहतुकीसाठी ज्यादा दराने पैसे द्यावे लागत आहेत. किसान रेल्वे धावत नसल्याने सांगोला येथील शेतकऱ्यांचे हाल होत आहेत. याच अडचणीला घेऊन सांगोला येथील शेतकऱ्यांनी डीआरएम कार्यालयात येऊन किसान रेल्वे सुरू करावी, अशी मागणी केली. तसेच मागणी मान्य न झाल्यास रेल्वे रोको आंदोलन करू, असा इशारा एडीआरएम परिहार यांना दिला.