एका कंत्राटदाराकडून ६० हजारांची लाच घेताना सांगोला नगरपालिकेचे नगराध्यक्ष नवनाथ पवार यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून रंगेहाथ पकडले. त्यांच्या विरुद्ध सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोलापूर जिल्ह्य़ात एखादा लोक्रतिनिधी लाच घेताना पकडला जाण्याची ही पहिलीच घटना असल्याचे मानले जाते.
शेकापच्या ताब्यात असलेल्या सांगोला नगरपालिकेने शहरविकास आराखडय़ासाठी संगणकीकृत नकाशे तयार करून देण्याचे काम एका कंपनीवर सोपविले होते. हे काम कंपनीने यापूर्वीच केले होते. त्यासाठी दीड लाखांचे देयक नगरपालिकेकडून मंजूर झाले होते. परंतु त्याचा धनादेश प्राप्त होत नव्हता. त्यासाठी कंत्राटदार कंपनीच्या संचालिकेच्या पतीने नगराध्यक्ष नवनाथ पवार यांची भेट घेतली असता धनादेश देण्यासाठी त्यांनी ६० हजारांची लाच मागितली.
या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सोलापूर कार्यालयाकडे तक्रार दाखल केली असता पोलीस उपअधीक्षक गणेश जादवाड यांच्या पथकाने सांगोल्यात महात्मा फुले चौकातील नगराध्यक्ष पवार यांच्या मालकीच्या सायकल दुकानाबाहेर सापळा लावला. यात तक्रारदाराकडून ६० हजारांची लाच स्वीकारली असता नगराध्यक्ष पवार हे अलगद जाळ्यात सापडले.
सांगोला नगराध्यक्षाला ६० हजारांची लाच घेताना रंगेहात पकडले
एका कंत्राटदाराकडून ६० हजारांची लाच घेताना सांगोला नगरपालिकेचे नगराध्यक्ष नवनाथ पवार यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून रंगेहाथ पकडले.
First published on: 25-09-2014 at 02:50 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sangola mayor arrested in corruption