समर्थ फाऊंडेशन अलिबाग यांच्यातर्फे अलिबाग येथे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेत पुण्याच्या संग्राम चौगुले याने विजेतेपद पटकावले. तो सरखेल कान्होजी आंग्रे श्री या किताबाचा मानकरी ठरला. स्वप्निल नेवाळकर बेस्ट पोझर ठरला तर पुण्याच्या सलीम अन्सारीने बेस्ट इम्प्रूव्हमेंटसाठीचे पारितोषिक पटकावले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अलिबाग शहर अध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते यांच्या ३२व्या वाढदिवसानिमित्त अलिबाग समुद्रकिनाऱ्यावरील मैदानात या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेत ८५ स्पर्धक सहभागी झाले होते. सहा वजनी गटांमध्ये स्पर्धकांची विभागणी करण्यात आली.
संग्राम चौगुले, अरुण पाटील, स्वप्निल नरवडकर, जगेश दैत, विश्वजीत तोरसे, सलीम अन्सारी यांनी आपापल्या गटात विजेतेपद मिळवून अंतिम फेरीत प्रवेश केला. या सहा जणांमध्ये किताबासाठी चुरस होती. संग्राम चौगुले याने संगीताच्या तालावर शरीरसौष्ठवाची प्रात्यक्षिके सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली. संग्रामने विजेतेपद पटकावले. त्याला कान्होजी आंग्रे श्री किताबासह २५ हजार रुपये रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. बेस्ट पोझर ठरलेला स्वप्निल नेवाळकर व बेस्ट इम्प्रूव्हमेंटचा विजेता सलीम अन्सारी यांना प्रत्येकी १० हजारांचे पारितोषिक देण्यात आले.
महाराष्ट्र बॉडीबिल्डिंग असोसिएशनच्या मान्यतेने घेण्यात आलेल्या या स्पर्धेतून आंध्र प्रदेश येथे होणाऱ्या भारत श्री स्पर्धेसाठीचा महाराष्ट्राचा संघ निवडला जाणार आहे. राज्यभरातील असोसिएशनतर्फे निरीक्षक म्हणून विकी गोरक्ष, नंदू खानविलकर, पपी पाटील, जनार्दन पाटील यांनी निरीक्षक म्हणून काम पाहिले.
सरखेल कान्होजी आंग्रे यांचे वंशज रघुजीराजे आंग्रे, अ‍ॅड. महेश मोहिते, अ‍ॅड. सागर पाटील, तसेच असोसिएशनचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत स्पर्धेचे पारितोषिक वितरण झाले. राज्याचे जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले. या वेळी ज्येष्ठ नेते अ‍ॅड. दत्ताजी खानविलकर, जिल्हा परिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रतोद महेंद्र दळवी, प्रकाश धुमाळ, विजय कवळे, रघुजीराजे आंग्रे आदी मान्यवर उपस्थित होते.

Story img Loader