नगरकरांना शहरात विकास हवा आहे. मागच्या पंचवीस वर्षांत प्रथमच शहरात विकासाच्या मुद्दय़ावर विधानसभेची निवडणूक झाली. त्यासाठीच मतदारांनी परिवर्तन घडवून आपल्यावर मोठाच विश्वास टाकला. राज्यात व केंद्रात सरकार कुठलेही असो, नगरकरांनी दाखवलेल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, अशी ग्वाही आमदार तथा महापौर संग्राम जगताप यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर जगताप यांनी प्रथमच पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, नगर शहरात परिवर्तन झाले ही साधी गोष्ट नाही. खुंटलेल्या विकासाला चालना देण्यासाठीच नगरकरांनी हा बदल घडवून आणला आहे. सरकार आपलेच असेल, तर काही गोष्टींना निश्चित धार येते. मात्र तसे नसले तरी, शहर विकासात आपण मागे राहणार नाही. इच्छाशक्ती दांडगी असेल, तर विकासात सरकारची अडचण येत नाही. नियोजनबद्ध कामे केल्यास विकास ही काही अशक्य अशी गोष्ट नाही. मात्र त्यासाठी प्रामाणिक आस लागते, हेच आपण कामातून नगरकरांना दाखवून देऊ, असे जगताप म्हणाले.
आमदारांना मिळणारा स्थानिक विकासनिधी पुरेसा नाही, मात्र योग्य नियोजन व नगरकरांची गरज लक्षात घेऊन आपण नियोजनबद्ध आखणी करून याच निधीतून मोठी कामे करून दाखवू, असा विश्वास जगताप यांनी व्यक्त केला. ते म्हणाले, आमदाराचे खरे काम आहे, हे कृतीतूनच येत्या पाच वर्षांत जनतेला दाखवून देऊ. यात कोठेही राजकारणाचा लवलेश नसेल. आमदार निधीशिवाय राज्य व केंद्र सरकारच्या अनेक योजना आहेत, त्यासाठी प्रभावी पाठपुरावा करणार आहे, यात पक्षीय राजकारण आडवे येणार नाही, याची आपल्याला खात्री आहे. शहरात प्रामुख्याने औद्योगिक आघाडीवर कमालीचे निराशाजनक चित्र आहे. ते प्राधान्याने बदलावे लागेल. औद्योगिक विकासाला चालना देण्यालाच आपले पहिले प्राधान्य आहे. नगरचे भूमिपुत्र तथा व्हिडिओकॉन उद्योगसमूहाचे अध्यक्ष वेणुगोपाल धूत यांच्याशी याबाबत पूर्वीच आपली चर्चा झाली होती. शहराच्या उद्योगीकरणासाठी त्यांची खास भेट घेतली होती. त्यांचा बंद पडलेला शहरातील प्रकल्प पुन्हा सुरू व्हावा, असे साकडे आपण त्यांना घातले आहे. त्यांनीही अतिशय सकारात्मक प्रतिसाद दिला असून, त्यांचे एक पथकही यासंदर्भात नगरला येऊन गेले, अशी माहिती जगताप यांनी दिली. त्याचा पाठपुरावा आता करणार आहोत असे ते म्हणाले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा