राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन गट झाल्यापासून दोन्ही गटांमधील नेते सातत्याने एकमेकांवर टीका करत आहेत. अजित पवार गटातील नेते थेट पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना लक्ष्य करत आहेत. दोन्ही गटात तणाव निर्माण झालेला असताना शुक्रवारी (१० नोव्हेंबर) अजित पवार आणि शरद पवार यांची भेट झाली. या भेटीवेळी खासदार सुप्रिया सुळेदेखील उपस्थित होत्या. शरद पवारांचे बंधू आणि उद्योगपती प्रतापराव पवार यांच्या पुण्यातील निवासस्थानी शरद पवार आणि अजित पवारांची भेट झाली. त्यापाठोपाठ मंगळवारी (१४ नोव्हेंबर) दिवाळी पाडव्यानिमित्त अजित पवार यांनी शरद पवार यांचं निवासस्थान असलेल्या गोविंद बागेत आयोजित पवार कुटुंबाच्या स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाला हजेरी लावली. तर बुधवारी भाऊबीजेनिमित्त शरद पवार यांनी अजित पवार यांच्या काटेवाडी येथील निवास्थानी हजेरी लावली.
शरद पवार आणि अजित पवारांच्या या भेटींमुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांमधील नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण असल्याचं बोललं जात आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे क्रीडा तथा युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय बनसोडे म्हणाले, राजकारण वेगळं आणि नाती वेगळी असतात. नाती कधीही तुटत नाहीत आणि नाती कधीच तुटू नये असं मला वाटतं.
हे ही वाचा >> “…नाहीतर डोळ्याला झंडूबाम लावून रडण्याची वेळ येते”, रामदास कदमांच्या टीकेला अजित पवार गटाचं उत्तर
मंत्री संजय बनसोडे म्हणाले, ते (पवार) कुटुंब आहे. शरद पवार हे संपूर्ण कुटुंबाला एकसंघ ठेवण्याचं काम करत असतात. दिवाळीला एकत्र येण्याची पवार कुटुंबाची गेल्या अनेक वर्षांची परंपरा आहे. कुटुंब एकत्र ठेवण्याची गोविंदबागेची कित्येक वर्षांची परंपरा आहे. दरवर्षी दिवाळीला संपूर्ण पवार कुटुंब एकत्र येतं. सगळे मिळून स्नेहभोजन करतात, चर्चा करतात, एकमेकांशी गप्पा मारतात. ही त्यांची अनेक वर्षांची पंरपरा आहे आणि ती कायम राहील. कारण राजकारण वेगळ्या ठिकाणी असतं, राजकीय भूमिका वेगळ्या असतात, परंतु पवार हे कुटुंब म्हणून एकसंघ राहतात. या सगळ्यामुळे आमच्या आमदारांमध्ये संभ्रम नाही. आम्हा आमदार आणि मंत्र्यांचा आमच्या नेत्यांवर विश्वास आहे. कुठेही संभ्रमाचं वातावरण नाही.