मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेना पक्षात ऊभी फूट पडली. या बंडखोरीनंतर उद्धव ठाकरे गटाकडून शिंदे गटातील नेत्यांना रोखण्यासाठी अन्य नेत्यांना बळ देण्याचा प्रयत्न केला जात आहे. आज यवतमाळमधील नेते संजय देशमुख यांनी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हाती शिवबंधन बांधले. संजय देशमुख हे शिंदे गटातील नेते संजय राठोड यांचे राजकीय विरोधक आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरेंकडून देशमुख यांना बळ दिले जात आहे. दरम्यान, संजय देशमुख यांनी उद्धव ठाकरे गटात प्रवेश केल्यानंतर पक्षविस्ताराच्या दृष्टीने महत्त्वाची घोषणा केली आहे. मी पोहरा देवीचे दर्शन घेण्यासाठी नक्की येणार आहे. मेळाव्यासाठी तुम्ही तारीख ठरवा. मी आलोच, असे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
हेही वाचा >>> राज्यात ओला दुष्काळ जाहीर होणार का? कृषीमंत्री सत्तार स्पष्टच बोलले; म्हणाले “मंत्रीमंडळ बैठकीत…”
महाराष्ट्रातील संस्कारी माणसांना जे झालं ते पटलेलं नाही. ज्यांचा आपल्याशी संबंध येणार नाही, तसे लोक आपल्यासोबत येत आहेत. वेगवेगळ्या धर्माचे लोक सोबत येत आहेत. तुम्ही फक्त लढा. जे होत आहे ते आम्हाला पसंद नाही, असे मला लोक म्हणत आहेत. या देशातील लोकशाही वाचवण्याचा हा प्रयत्न आहे, असे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.
माझे काय होणार, शिवसेनेचे काय होणार? हे ठरवणारे तुम्ही आहात. मला त्याची चिंता नाही. मात्र देशाचे काय होणार? देशात लोकशाही राहणार आहे की नाही? हा प्रश्न प्रत्येकाने स्वत:ला विचारला पाहिजे, असे उद्धव ठाकरे कार्यकर्त्यांना उद्देशून म्हणाले. तसेच मी पोहरा देवीच्या दर्शनाला येणारच आहे. कधी मेळावा घ्यायचा, कुठे घ्यायचा हे ठरवा. मी येणार आहे, असेही ठाकरे यांनी जाहीर केले.