दुधाचा भाव स्थिर आहे. मात्र, भाजीपाल्याचा नाही. कपडे, बूट खरेदी करताना आपण काही विचार करत नाही. मात्र, भाजीपाला घेताना चिकित्सक बनतो. साखरेचे भाव पाच रुपयांनी वाढले तरी आपण रस्त्यावर येतो. मात्र, मोबाइल रिजार्च किंवा पेट्रोलच्या भरमसाट दरवाढीचा तितका विचार करत नाही. एकप्रकारे आपणच शेतक ऱ्यांचे अध:पतन करतो, ही मानसिकता बदलणे गरजेचे आहे, असे मत संजय देशमुख यांनी व्यक्त केले.
‘बदलता महाराष्ट्र’ या उपक्रमात ‘शेतीमधील अभिनव प्रयोग’ या विषयावरील परिसंवादात ते बोलत होते. देशमुख यांच्यासह ऊस विशेषज्ञ डॉ. ज्ञानदेव हापसे, द्राक्ष तज्ज्ञ एन. बी. म्हेत्रे, प्रगतिशील शेतकरी डॉ. दत्तात्रय वणे या परिसंवादात सहभागी झाले होते. देशमुख म्हणाले, शेतीदर स्थिर हवा, बी पेरल्यानंतरच्या तीन महिन्यांचे आर्थिक नियोजन हवे. शेतक ऱ्यांना मार्गदर्शन मिळावे. शेतीला उद्योगाचा दर्जा मिळावा, डॉक्टर, अभियंत्यांच्या तुलनेत शेतकरी पाणी, वीज, अर्थसाहाय्य, बाजारपेठ अशा अनेक प्रतिकूल बाबींशी सामना करत काम करतात. त्यांना या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, त्यानंतर, अनुदानाची गरजही भासणार नाही. डॉ. हापसे म्हणाले, चुकीच्या पद्धतीने काम केल्यास अतोनात नुकसान होते. फाळाच्या नांगराने नांगरणी केली जाते, त्यामुळे मातीची लादी उलटी पडते, त्यातील जिवाणू सुटे होतात व मातीचा ढाचा बदलतो. मातीची धूप मोठय़ा प्रमाणात होते, पाणीही आत मुरत नाही. चुकीच्या नांगरणीमुळे मुळं वाढत नाहीत. मुळं वाढण्यासाठी सारखी मशागत करू नये. जमीन पोकळ ठेवावी, त्यासाठी गांडुळांची मदत होते. मुळांना वाढण्यासाठी जागा मिळावी, यासाठी दोन ओळींमध्ये जास्त अंतर ठेवावे. मधल्या जागेमध्ये इतर पिके लावावीत. झाडे वाढायला एकमेकांना मदत करतात, बाहेरून काही टाकायची गरज राहात नाही. तण संतुलन ठेवायला आणि जमिनीची सुपिकता वाढवायला मदत करतात. उसाच्या मुळांजवळ पाणी द्यावे. जमिनीला आच्छादन असावे. उसाचे एकरी उत्पादन १५० ते २०० टनांवर नेणे शक्य आहे. तसे प्रयोग सुरू असून त्याला यश मिळते आहे. डॉ. वणे म्हणाले, तुषार सिंचनाने हरभरा पिकाची आम धुवून जाते, हा गैरसमज प्रयोगातून दूर झाला. एकरी उत्पादन वाढले. शास्त्रज्ञ व प्रयोगशील शेतकरी यांनी एकत्रितपणे सामान्य शेतक ऱ्याचा तसेच तंत्रज्ञान विस्तारात दुवा बनावे. पाण्याचा जपून वापर केला पाहिजे. शास्त्र म्हणून पिकाकडे पाहिले पाहिजे. पूर्वापार चालत आलेली मानसिकता बदलली पाहिजे. शेतीखर्चाचा हिशेब ठेवला पाहिजे. शेतीत ‘अस्मानी’ मुळे तोटा होत नसून ‘सुलतानी’ संकटांमुळे होतो. विक्री व्यवस्थापन शिकले पाहिजे. पीकपद्धती बदलली पाहिजे, उत्पादकता वाढवली पाहिजे. भौगोलिक परिस्थिती पाहून पिकात बदल करावा आणि भूमातेला समृद्ध करावे. म्हेत्रे म्हणाले, की शेतीत नापास व्हायचे नसेल तर जैविक भार, जमीन व मुळे, जिवाणू, सेंद्रिय व रासायनिक खते यांचा समतोल राखावा, द्राक्ष बागेला रासायनिक औषधांचा, संजीवकांचा अतिरेक होता कामा नये, याची खबरदारी घेतली गेली पाहिजे. तासगावातील सातवीत शिकलेल्या शेतक ऱ्यांनी परदेशातून द्राक्षाचे तंत्रज्ञान आणून तेच अनुभवातून शेतीत राबवले, त्याची दखल कृषी संशोधकांना घ्यावी लागली. भविष्यात रासायनिक औषधे व खतांचा वापर न करता सेंद्रिय पद्धतीने द्राक्ष पिकवता येतील, त्याकरिता जमिनीखालच्या भागाचा विचार शेतक ऱ्यांनी केला तरच ते शक्य होईल, असे ते म्हणाले.