शिवसेनेच्या बंडखोर शिंदे गटातील आमदार संजय गायकवाड यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील वादग्रस्त वक्तव्यावरून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यावर सडकून टीका केली. “या राज्यपालांना कुठे नेऊन घालायचं तिकडे घाला, पण महाराष्ट्राच्या राज्यपालपदावर मराठी मातीतील माणूस बसवा,” अशी मागणी केली. शिंदे गटातीलच आमदाराने कोश्यारींना इतर राज्यांत राज्यपाल करा, पण महाराष्ट्रात नको, अशी भूमिका घेतल्याने अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. ते सोमवारी (२१ नोव्हेंबर) माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत बोलत होते.
संजय गायकवाड म्हणाले, “भगतसिंग कोश्यारी महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी हा महाराष्ट्र घडवला त्यांचा राज्यपालांनी तीन ते चारवेळा एकेरी उल्लेख केला. छत्रपतींना शिवाजी म्हणतात आणि शिवाजी जुने झाले असंही सांगतात. या राज्यपालांना कळालं पाहिजे की, शिवविचार कधी जुना होत नाही. तसेच त्यांची तुलना जगातील कोणत्याही महापुरुषाशी करता येत नाही.”
“माझी भाजपाच्या सर्व केंद्रीय नेत्यांना विनंती आहे”
“माझी भाजपाच्या सर्व केंद्रीय नेत्यांना विनंती आहे की, ज्या राज्यपालांना महाराष्ट्राचा इतिहास माहिती नाही, राज्य काय आहे हे ज्याला कळत नाही, अशा माणसाला आपल्या राज्याच्या राज्यपालपदावर ठेऊन उपयोग नाही. राज्यपालपदावर या मराठी मातीतील माणूसच ठेवावा,” अशी मागणी संजय गायकवाडांनी केली.
हेही वाचा : “एकदा मी अब्दुल सत्तारांना माईकने मारणार होतो, पण…”; हिरवा साप म्हणत चंद्रकांत खैरेंची सडकून टीका
“या राज्यपालांना कुठे नेऊन घालायचं तिकडे घाला,” असं म्हणत गायकवाडांनी भगतसिंग कोश्यारींवर खोचक वक्तव्य केलं.