मराठा आरक्षणाची मागणी करत जालन्यातल्या अंतरवाली सराटी या गावात उपोषणाला बसलेल्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याच्या घटनेचे राज्यभर पडसाद उमटू लागले आहेत. या घटनेवरून विरोधी पक्षांनी राज्य सरकारला धारेवर धरलं आहे. विरोधी पक्षांमधील अनेक नेत्यांनी आज आंतरवाली सराटी गावाला भेट दिली. तसेच उपोषणकर्त्या मराठा बांधवांची भेट घेतली. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही काही वेळापूर्वी मराठा आंदोलकांची आणि ज्यांच्या नेतृत्वात हे उपोषण सुरू होतं त्या मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. तसेच पोलिसांच्या लाठीहल्ल्यात जखमी झालेल्या आंदोलकांची रुग्णालयात जाऊन विचारपूस केली. त्यानंतर शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली.
दरम्यान, शरद पवारांच्या टीकेला शिवसेनेच्या शिंदे गटाने प्रत्युत्तर दिलं आहे. शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी काही वेळापूर्वी टीव्ही ९ मराठीशी बातचीत केली. यावेळी संजय गायकवाड म्हणाले, आज विरोधी पक्ष आमच्यावर टीका करतोय, परंतु वर्षभराआधी हेच लोक सरकारमध्ये होते. त्यांच्या काळात अशा प्रकारच्या ज्या घटना घडल्या तेव्हा यांनी पोलिसांना आदेश दिले होते का? अशा कुठल्याही घटनेत मुख्यमंत्री किंवा गृहमंत्री अशा प्रकारचे आदेश देत नाहीत. तो तिथल्या एखाद्या अधिकाऱ्याचा विक्षिप्तपणा असू शकतो. त्याची चौकशी होईल आणि दोषी अधिकाऱ्यावर कारवाई होईल. सरकार त्याच्यावर कारवाई करेल.
संजय गायकवाड म्हणाले, निवडणुका डोळ्यासमोर दिसू लागल्या की विरोधकांना आग लावण्याशिवाय दुसरा धंदा नसतो. आज शरद पवार जालन्याला गेले. शरद पवार यांनी आजपर्यंत मराठा समाजाला आरक्षण देण्याचं कधी समर्थन केलंय का? ते चार वेळा मुख्यमंत्री झाले. तेव्हा कधीच त्यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्याची भूमिका घेतली नाही. त्यांनी अशी भूमिका का घेतली नाही? आज त्यांना कसा काय मराठा समाजाचा पुळका आलाय?
हे ही वाचा >> “लहान मुलं, स्त्रिया , वडिलधारे पाहिले नाहीत, प्रत्येकावर…”, शरद पवारांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप; म्हणाले…
संजय गायकवाड म्हणाले, विरोधकांचं हे सगळं नाटक सुरू आहे. राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं सरकार वेगवान कामगिरी करत आहे. त्यामुळेच कुठेतरी आग लावायचा, शांतता भंग करायचा, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करायचा प्रयत्न होणार आहे.