अलीकडेच शिंदे गटाकडून प्रसिद्ध केलेल्या कथित जाहिरातीवरून महाराष्ट्रातील राजकारण तापलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देवेंद्र फडणवीसांपेक्षा जास्त लोकप्रिय आहेत, अशी जाहिरात वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध करण्यात आली होती. तसेच “राष्ट्रामध्ये मोदी आणि महाराष्ट्रात शिंदे” असा संदेशही या जाहिरातीतून देण्यात आला होता. ही जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर भाजपा आणि शिंदे गटातील वाद चव्हाट्यावर आल्याचं दिसत आहे.
याच जाहिरातीच्या पार्श्वभूमीवर भाजपा आणि शिंदे गटातील नेत्यांकडून एकमेकांवर टीका केली जात आहे. दरम्यान, भाजपा खासदार अनिल बोंडे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर तोंडसुख घेतलं आहे. बेडूक कितीही फुगला तरी त्याचा हत्ती होत नाही. ठाणे म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र नाही, अशा शब्दांत अनिल बोंडे यांनी टीका केली. यावर शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
हेही वाचा- जाहिरातींमधून फडणवीसांची कोंडी कोण करतंय? अजित पवारांनी दिलं उत्तर; म्हणाले, “कोंबडा कितीही…”
“एकनाथ शिंदे हे वाघ आहेत. या ५० वाघांमुळेच भाजपाच्या मंत्र्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळालं आहे. बाळासाहेब ठाकरे नसते तर भाजपाची महाराष्ट्रात औकात काय होती?” अशा शब्दांत संजय गायकवाड यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ते ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलत होते.
हेही वाचा- “बेडूक कितीही फुगला तरी…”, भाजपा खासदाराचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल!
अनिल बोंडेंच्या टीकेला उत्तर देताना संजय गायकवाड म्हणाले, “शिवसेना आणि एकनाथ शिंदे हे वाघ आहेत. या ५० वाघांमुळेच भारतीय जनता पार्टीच्या मंत्र्यांना आता मंत्रिमंडळात स्थान मिळालं आहे. एखाद्या मुख्यमंत्र्यांचं काम जनतेला पटत असेल आणि जनता कौतुक करत असेल, तर ते पचवायची ताकद राजकीय नेत्यांमध्ये असायला हवी. एकनाथ शिंदे राज्यात काम करत आहेत. त्यांना बेडकाची उपमा देणं किंवा ते ठाण्यापुरते मर्यादित आहेत, असं म्हणणं चुकीचं आहे. पूर्वी तुम्ही (भाजपा) किती मर्यादित होता, कुणाच्या संगतीने तुम्ही महाराष्ट्रात मोठे झालात? याचा विचार केला पाहिजे. बाळासाहेब ठाकरेंचं बोट पकडून तुम्ही महाराष्ट्रात मोठे झाला आहात, बाळासाहेब ठाकरे नसते तर महाराष्ट्रात तुमची काय औकात होती? हे सगळ्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे. त्यामुळे बाळासाहेबांच्या शिवसेनेबद्दल आणि त्यांच्या नेत्यांबद्दल बोलताना अनिल बोंडे सारख्या खासदाराने आत्मचिंतन करून बोलायला हवं.”