विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत दिलेले भाषण हे गल्लीतल्या भाषणाप्रमाणे होते, असं विधान खासदार संजय राऊत यांनी सकाळी माध्यमांशी बोलताना केले होते. दरम्यान, या विधानावर प्रत्युत्तर देताना शिंदे गटाचे नेते संजय गायकवाड यांनी राऊतांचा एकेरी उल्लेख करत त्याला चाबरेपणा करायची सवय आहे, अशी प्रतिक्रिया दिली. ते बुलढाण्यात माध्यमांशी बोलत होते.
काय म्हणाले संजय गायकवाड?
“मुख्यमंत्र्यांच्या विधानसभेतील भाषणाने जनतेला भूरळ घातली आहे. संजय राऊतांच्या भाषणासारखा पांचटपणा मुख्यमंत्र्यांच्या भाषणात नसतो. संजय राऊतला चाबरेपणा करण्याची सवय आहे. त्याला वाटतं आपल्यासारखं मुख्यमंत्र्यांनी करायला हवं. मात्र, त्याच्यात आणि मुख्यमंत्र्यांमध्ये खूप फरक आहे. मुख्यमंत्री त्यांनी केलेल्या कामावर बोलतात. मात्र, संजय राऊत रि#$#% आहे. त्याने आयुष्यात काहीही काम केलेलं नाही, म्हणून त्याला दुसऱ्याची भाषणं गल्लीतली वाटतात”, अशी प्रतिक्रिया संजय गायकवाड यांनी दिली.
हेही वाचा – ‘ठाकरे-आंबेडकर एकत्र आले तरी फरक पडणार नाही’; रामदास आठवलेंचा खोचक टोला
“राऊतांसाठी धुणीभांडीचं काम शिल्लक राहील”
दरम्यान, आगामी निवडणुकीत भाजपाचे लक्ष्य १४५ जागांचं असेल तर शिंदे गटाचे आमदार काय धुणंभांडी करणार आहेत का? असंही संजय राऊत म्हणाले होते. यासंदर्भात विचारलं असता, “भाजपाचे जर १४५ जागा जिंकण्याचं लक्ष्य असेल तर आमचेही १०० जागा जिंकण्याचं लक्ष्य आहे. त्यामुळे निवडणुकीनंतर संजय राऊतांसाठी धुणीभांडी करण्याचं काम शिल्लक राहील, असे ते म्हणाले.