राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनामध्ये विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजांविषयी केलेल्या वक्तव्याचे तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. सत्ताधारी भाजपा आणि शिंदे गटाकडून त्यावर आक्षेप घेण्यात आले आहेत. तसेच, अजित पवारांनी माफी मागण्याचा मुद्दा उपस्थित केला जात आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये “ज्यांना जे म्हणायचंय, ते त्यांनी म्हणावं”, असं म्हटल्यामुळे आता अजित पवार काय भूमिका घेणार? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. यावरून आता शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी टीकास्र सोडलं आहे.
काय म्हणाले होते अजित पवार?
अजित पवारांनी विधानसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भाषणावर प्रतिक्रिया देताना संभाजी महाराजांचा उल्लेख केला होता. “मागच्या काळात झालं ते गंगेला मिळालं. आता ते कशाला उकळत बसायचं. उकिरडा कितीही उकरला तरी त्यातून काही निघत नाही. नव्या वर्षात राज्याचे प्रमुख म्हणून तुम्ही निर्णय घ्या की ‘हे कुणी काही बोलत असतील तर माझे प्रवक्ते वगैरे त्यावर बोलतील’, असं अजित पवार विधानसभेत म्हणाले होते. तसेच, यावेळी बोलतानात्यांनी संभाजी महाराजांचाही उल्लेख केला. “छत्रपती संभाजी महाराजांना आपण स्वराज्यरक्षक म्हणतो. काहीजण धर्मवीर म्हणतात. राजे कधीही धर्मवीर नव्हते. त्यांनी कधीच धर्माचा पुरस्कार केला नाही. शिवाजी महाराजांनीही हिंदवी स्वराज्याची स्थापना केली”, असंही अजित पवार म्हणाले होते.
“त्यांना लाज वाटत नाही का?”
दरम्यान, या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापलेलं असतानाच आता संजय गायकवाड यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर परखड शब्दांत हल्लाबोल केला आहे. “त्यांना जराही लाज वाटत नाही की एवढ्या क्रूरपणे वागणाऱ्या बादशाहाला ते म्हणतात की तो चांगला होता, क्रूर नव्हता. असं म्हणताना आमच्या दोन थोर राजांचा ते अपमान करत आहेत”, असं संजय गायकवाड म्हणाले.
“आमच्या सहनशीलतेचा अंत झाला तर…”, शिंदे गटाचा अजित पवारांना इशारा; शंभूराज देसाई म्हणतात…
“ज्यानं आमच्या राजाला मारलं, तो…”
“माझी शरद पवारांना विनंती आहे की जरा या थोबाडांना तुम्ही आवरा. कुणी म्हणतंय संभाजी महाराज धर्मवीर नव्हते, कुणी म्हणतंय औरंगजेब बादशाह क्रूर नव्हता. मग संभाजी महाराजांची हत्या कुणाच्या आदेशाने झाली. आपल्या भावाला, बापाला मारणारा कोण होता? हा क्रूर नाहीये? त्याचा सत्कार केला पाहिजे का? ज्यानं आमच्या राजाला मारलं, तो क्रूर नाहीये? या लोकांना असं विधान करताना लाज-शरम वाटली पाहिजे”, असंही ते म्हणाले.