महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची एक घणाघाती मुलाखत येत्या २६ आणि २७ जुलै या दोन दिवशी प्रसारित होणार आहे. ठाकरे गटाचे खासदार आणि ‘सामना’ या शिवसेनेच्या मुखपत्राचे संपादक संजय राऊत यांनी ही मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीचा टिझर प्रसारित करण्यात आला आहे. यामध्ये उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उल्लेख खेकडा असा केला आहे. या मुलाखतीत संजय राऊत उद्धव ठाकरे यांना म्हणाले, तुमच्या नेतृत्वाखालील सरकार मागच्या वर्षी मुसळधार पावसात वाहून गेलं… त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले, “सरकार वाहून गेलं नाही तर खेकड्याने धरण फोडलं.”
उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उल्लेख खेकडा असा केल्याने शिवसेनेच्या शिंदे गटातील नेते आक्रमक झाले आहेत. उद्धव ठाकरे यांच्या टीकेला पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी उत्तर दिलं आहे. त्यांच्यापाठोपाठ आता आमदार संजय गायकवाड यांनीही उद्धव ठाकरेंवर पलटवार केला आहे.
आमदार संजय गायकवाड म्हणाले, ते स्वतः अकार्यक्षम आहेत, ही गोष्ट ते सांगू शकत नाहीत. अडीच वर्षांचं सरकार असताना या अडीच वर्षांमध्ये ते अडीच तासही मंत्रालयात कधी आले नाहीत. घराबाहेर पडले नाहीत. कोरोनाच्या धाकाने स्वतःला चार भिंतींच्या आत कोंडून घेतलं. परंतु, आता भाषणांमध्ये तसेच पत्रकारांना ते सांगतात, मी घरी बसून सरकार चालवलं. अरे घरी बसून काय शेती करता येते का? व्यवसाय करता येतो का?
आमदार संजय गायकवाड टीव्ही ९ मराठीशी बोलत होते. यावेळी आमदार गायकवाड म्हणाले, तुम्हा पत्रकारांनाही शोधपत्रकारितेसाठी घराबाहेर पडावं लागतं. घरात बसून पत्रकारिता होऊ शकते का? स्वतःची पात्रता नसताना तुम्ही (उद्धव ठाकरे) त्या ठिकाणी राज्य सांभाळायला बसलात. तुम्ही काम करत नव्हता म्हणून आमदार नाराज झाले होते.
हे ही वाचा >> जळगावात मध्यान्ह भोजन योजनेत १०० कोटींचा घोटाळा, सुषमा अंधारेंचा ‘या’ दोन नेत्यांवर आरोप
दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या टीकेला मंत्री गुलाबराव पाटील यांनीही प्रत्युत्तर दिलं आहे. गुलाबराव पाटील म्हणाले, “खेकडा हा अत्यंत गुणकारी प्राणी आहे. ज्याला कावीळ झालेली असते, त्यांच्यासाठी खेकडा हा प्राणी फार गुणकारी असतो. त्याला चांगलं सांभाळलं असतं तर कदाचित धरणच फुटलं नसते,” अशी प्रतिक्रिया गुलाबराव पाटील यांनी दिली.