करोना काळात मुंबई महानगरपालिकेने गरीब कामगारांना खिचडी वाटप करण्यासंदर्भात उपक्रम सुरू केला होता. मात्र, ठाकरे गटाच्या नेत्यांनाच या खिचडी वाटपाचे कंत्राट दिले गेले. तसेच या घोटाळ्यात संजय राऊत यांनाही दलाली देण्यात आली, तेच या घोटाळ्याचे खरे सुत्रधार आहेत, असा दावा काँग्रेसचे माजी नेते संजय निरुपम यांनी केला आहे. आज मुंबईत पत्रकार परिषद घेत त्यांनी यासंदर्भातील आरोप केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय म्हणाले संजय निरुपम?

करोना काळात मुंबईत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला. मुंबई महानगरपालिकेने गरीब कामगारांना खिचडी वाटप करण्यासंदर्भात उपक्रम सुरू केला होता. या खिचडी वाटपाचे कंत्राट ठाकरे गटाच्या नेत्यांना देण्यात आले होते. या संपूर्ण घोटाळ्याचे सूत्रधार संजय राऊत होते. संजय राऊत हे खिचडी चोर असून त्यांनी त्यांची मुलगी, त्यांचे भाऊ आणि त्याचे पार्टनर यांच्या नावाने पैसे घेतले, असा आरोप संजय निरूपम यांनी केला.

हेही वाचा – “साक्षगंध होण्यापूर्वीच आम्ही आंबेडकरांना पसंत केलं, परंतु हुंड्यासाठी…”, काँग्रेसची …

या खिचडी वाटपाचे कंत्राट सह्याद्री रिफ्रेशमेंट नावाच्या कंपनीला देण्यात आले होते. या कंपनीत राजीव साळुंखे आणि सुजित पाटकर हे पार्टनर आहेत. सुजित पाटकर हे संजय राऊत यांच्या अगदी जवळचे मानले जातात. या कंपनीला ६ कोटी ३६ लाख रुपयांच्या खिचडी वाटपाचे कंत्राट मिळाले होते. मात्र, या कंपनीकडून संजय राऊत यांनी कुटुबातील संदस्यांमार्फत १ कोटी रुपयांची दलाली घेतली, असा दावाही संजय निरुपम यांनी केला.

हेही वाचा – “५६ वर्षांत मी एकही सुट्टी घेतली नाही”, शरद पवारांचं विधान चर्चेत; म्हणाले, “शेतकरी आ…

याशिवाय संजय राऊत यांच्या मुलीच्या खात्यात २९ मे २०२० रोजी ३ लाख ५० हजार रुपयांची रक्कम जमा करण्यात आली होती. तसेच २६ जून २०२० रोजी ५ लाख रुपये, ७ ऑगस्ट २०२० रोजी १ लाख २५ हजार रुपये, तर २० ऑगस्ट २०२० रोजी ३ लाख रुपये जमा करण्यात आले, असेही संजय निरुपम यांनी सांगितलं. याशिवाय संजय राऊत यांचे भाऊ संदीप राऊत यांच्या खात्यात ६ ऑगस्ट २०२० रोजी ५ लाख रुपये, २० ऑगस्ट रोजी १ लाख २५ हजार रुपये, तसेच सुजित पाटकर यांच्या खात्यात १५ जुलै २०२० रोजी १४ लाख रुपये, ५ ऑगस्ट २०२० रोजी पुन्हा १४ लाख रुपये, २९ ऑक्टोबर २०२० रोजी १० लाख रुपये, १७ डिसेंबर २०२० रोजी १ लाख ९० हजार रुपये आणि १२ जानेवारी २०२१ रोजी पुन्हा १ लाख ९० हजार रुपये जमा करण्यात आले, असा दावा त्यांनी केला.

या कंपनीने जोगेश्वरीमधील एका हॉटेलचे स्वयंपाकघर आपले असल्याचा दावा करून कंत्राट मिळवले होते. संबंधित हॉटेलच्या मालकालाही याची माहिती नव्हती. महत्त्वाचे म्हणजे या कंपनीत कदम नावाची कोणतीही व्यक्ती व्यक्ती नाही. मात्र, ज्यावेळी कंत्राटसाठी अर्ज करण्यात आला, तो कदम नावाच्या व्यक्तीच्या नावे करण्यात आला होता. या कंपनीने ६.३६ कोटी रुपयांचे कंत्राट घेऊन दुसऱ्या कंपनीला दिले, असा आरोपही संजय निरुपम यांनी केला. तसेच या घोटाळ्याचा तपास ईडीकडून करण्यात येत आहे. याप्रकरणी संजय राऊत यांनाही अटक करण्यात यावी, अशी मागणीही निरुपम यांनी केली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanjay nirupam allegations on sanjay raut to take bribe in mumbai khichadi scam spb