लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागा वाटपाची चर्चा सुरू आहे. महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी लढत रंगणार आहे. परंतु, अंतर्गत वादांमुळे दोन्ही आघाड्यांमध्ये वाद निर्माण झाले आहेत. महाविकास आघाडीमध्येही मतभेद निर्माण झाल्याची चिन्ह आहेत. त्यातच मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघात अमोल किर्तीकरांना उमेदवारी मिळाल्याने काँग्रेसचे संजय निरुपम संतापले आहेत. हाच संताप त्यांनी आज पुन्हा व्यक्त केला. ते आज माझा कट्ट्यावर बोलत होते.
संजय राऊतांनी शिवसेना संपवली, असं वाटतं का, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. त्यावर ते म्हणाले, संजय राऊतांनी स्वतःची शिवसेना संपवली, राष्ट्रवादी संपवली आणि आता ते आमची काँग्रेसही संपवत आहेत. ज्याप्रमाणे मुंबईत जोर देऊन सहा पैकी पाच जागा घेण्याचा हट्ट आणि महाराष्ट्रातील ४८ पैकी जास्तीत जास्त जागा घेण्याचा हट्ट त्यांनी केला. त्यांच्याकडे काही नाहीय. त्यांचे नेते पळाले, त्यांचे कार्यकर्ते पळाले. त्यांचे मतदार किती हेही माहीत नाही. तरीही जबरदस्ती करून ते आमच्याकडून जागा घेत आहेत. मी आज भाकित करून जातो की मुंबईमध्ये पाचच्या पाचही जागा शिवसेना गमावणार आहे.
“मी आव्हान देतो की ते एकही जागा जिंकणार नाहीत. जेव्हा पाच जागा पडणार तेव्हा शिवसेना संपली आणि काँग्रेसही संपणार. कारण या पाच मतदारसंघातील कार्यकर्ता विखुरणार. वाटाघाटी बरोबरीचं झालं पाहिजे. आमचा प्रस्ताव होता की चीन तीन जागा घ्या. पण पाच जागा तुम्ही घेणार आणि एक आम्हाला देणार. मग आम्ही कार्यकर्त्यांना काय सांगणार? विदर्भात काँग्रेसची ताकद आहे, पण मुंबईत त्यांची ताकद नाही. ठाकरे गटाची सध्या काय ताकद आहे, हे कोणीही काही सांगू शकत नाही”, असंही ते म्हणाले.