Sanjay Nirupam On Kunal Kamra Eknath Shinde Controversy : स्टॅण्डअप कॉमेडियन कुणाल कामराने काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक गाणं करून ते शोमध्ये सादर केलं होतं. मात्र, विडंबनात्मक गाणं सादर केल्याप्रकरणी शिवसेना (शिंदे) पक्षाचे कार्यकर्ते चांगेलच आक्रमक झाले होते. तसेस काही कार्यकर्त्यांनी कुणाल कामराच्या स्टुडिओची तोडफोड केली होती. या संपूर्ण प्रकरणावरून राज्यात नव्या वादाला तोंड फुटलं होतं. दरम्यान, नंतर या प्रकरणात कुणाल कामराच्या विरोधात गुन्हा देखील दाखल झाला.

त्यानंतर मुंबई पोलिसांनी कुणाल कामराला चौकशीसाठी तीन समन्स बजवले. मात्र, कुणाल कामरा अद्याप चौकशीसाठी हजर झाला आहे. कुणाल कामराने न्यायालयात धाव घेतली असून न्यायालयाने कुणाल कामराला तात्पुराता दिलासा दिलेला आहे. मात्र, कुणाल कामराने विडंबनात्मक गाणं सादर केल्याप्रकरणावरून अद्यापही राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. आता शिवसेना (शिंदे) पक्षाचे नेते संजय निरुपम यांनी कुणाल कामरा आणि उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक गाणं करण्यासाठी ठाकरे गटाने कुणाल कामराला पैसे दिले असल्याचा गंभीर आरोप संजय निरुपम यांनी केला आहे.

संजय निरुपम काय म्हणाले?

“शिवसेना ठाकरे गटासाठी ही निंदनीय बाब आहे. त्यांच्याकडे (उद्धव ठाकरे) आता कार्यकर्ते राहिले नाहीत. त्यांचे विचार देखील संपले आहेत. त्यामुळे ते एका कॉमेडियनचा सहारा घेऊन राजकारण करत आहेत. मी या प्रकरणाच्या सुरवातीलाच सांगितलं होतं की कुणाल कामराने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत अशा प्रकारे आपत्तीजनक विधान केलं. पण कुणाल कामरा जे बोलला ते तो बोलत नसून ठाकरे गटाचे लोक बोलत आहेत”, असा आरोप संजय निरुपम यांनी केला.

“ठाकरे गटाच्या लोकांनी त्याला (कुणाल कामराला) पैसे दिले होते. ठाकरे गटाच्या सांगण्यावरून ते विडंबनात्मक गाणं बनवण्यात आलं. तसेच संजय राऊत, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे हे कुणाल कामराच्या समर्थनार्थ उभे आहेत. त्यावरून हे दिसून येतं की त्यांच्याकडे दुसरा काही मुद्दा, विषय राहिला नाही. या संपूर्ण प्रकरणात ‘मातोश्री’चा सहभाग आहे. एवढंच नाही तर ‘मातोश्री’ने यासाठी फंडीग केलं आहे. आता कुणाल कामरा कायद्याच्या चौकटीत अडकला आहे, तर त्याला वाचवण्याचा प्रयत्न काहीजण करत आहेत. मात्र, ते कुणाल कामराला कायद्याच्या कारवाईपासून वाचवू शकणार नाहीत”, असंही संजय निरुपम यांनी म्हटलं आहे.