महाराष्ट्रासह देशभरातले सर्वच पक्ष लोकसभा निवडणुकीच्या कामाला लागले आहेत. महाराष्ट्रात महाविकास आघाडी आणि महायुतीत जागावाटपावरून चर्चा सुरू झाल्याच्या बातम्या समोर येऊ लागल्या आहेत. अशातच महाविकास आघाडीत शिवसेनेचा ठाकरे गट राज्यातल्या लोकसभेच्या १८ हून अधिक जागांसाठी अग्रही असल्याचं बोललं जात आहे. ठाकरे गटातील खासदार संजय राऊत यांनी काही वेळापूर्वी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी राऊत म्हणाले, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत आम्ही २३ जागा लढलो होतो. त्यापैकी १८ जागांवर आम्ही विजय मिळवला होता. संभाजीनगरमध्ये अवघ्या काही मतांनी आमचा उमेदवार पडला. त्यामुळे जिंकलेल्या जागांवर चर्चा करायची नाही, असं महाविकास आघाडीचं धोरण ठरलं आहे. काँग्रेसनं महाराष्ट्रात जागाच जिंकल्या नाहीत. परंतु, काँग्रेसची ताकद असलेल्या जागा त्यांना मिळणार. यावर दिल्लीतल्या हायकमांडबरोबर आमचं एकमत झालं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काँग्रेस नेते आणि माजी खासदार संजय निरुपम हे जास्तीत जास्त जागा काँग्रेसला मिळाव्यात यासाठी अग्रही आहेत. तशी वक्तव्ये निरुपम यांनी अलीकडच्या काळात केली आहेत. त्यावर प्रतिक्रिया देताना खासदार राऊत म्हणाले, “महाराष्ट्रात कोणी काहीही वक्तव्य करत असेल, तर त्याकडे फार गांभीर्यानं पाहण्याची गरज नाही,” संजय निरुपम यांच्याबद्दल प्रश्न विचारल्यावर संजय राऊत म्हणाले, “संजय निरुपम कोण आहेत? संजय निरुपमांना काही अधिकार आहेत का? काँग्रेसचं हायकमांड दिल्लीत आहे. त्यामुळे आम्ही दिल्लीत चर्चा करू.”

राऊत यांच्या या वक्तव्यावर आता संजय निरुपम यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय निरुपम म्हणाले, शिवसेना (ठाकरे गट) स्वबळावर लोकसभेची एकही जागा जिंकू शकत नाही. त्यांना माझं आव्हान आहे. ठाकरे गटाला निवडणुकीत काँग्रेसची गरज आहे. त्याचप्रमाणे काँग्रेसलाही त्यांची गरज आहे. त्यांनी मागच्या निवडणुकीत १८ जागा जिंकल्या होत्या. परंतु, त्यापैकी एक डझनहून अधिक गद्दार पळून गेले आहेत. आता त्यांच्याकडे चार-पाच खासदार राहिले आहेत. तेदेखील राहणार आहेत की नाही, याबाबत काहीच सांगता येत नाही.

हे ही वाचा >> ८० गाड्या खरेदीसाठी अजित पवारांकडे १५ कोटी कुठून आले? अजली दमानियांचा प्रश्न, सिंचन घोटाळ्याचा उल्लेख करत म्हणाल्या…

संजय राऊत यांनी कोण संजय निरुपम? असा प्रश्न प्रसारमाध्यमांसमोर उपस्थित केला होता. त्यावर प्रतिक्रिया देताना निरुपम म्हणाले, राऊतांची स्मरणशक्ती थोडी क्षीण झाली आहे असं वाटतंय. संजय निरुपम कोण आहे हे शिवसेनेत त्यांनाच माहिती आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanjay nirupam says shivsena thackeray faction cant win single seat in lok sabha election 2024 asc