यवतमाळ : राज्यात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय नाट्यात दिग्रसचे आमदार संजय राठोड यांनी शिंदे गटात सहभागी होऊन जिल्ह्यातील नव्या राजकीय अंकाचा प्रारंभ केला. राठोड आज, गुरुवारी सायंकाळपर्यंत गुवाहाटी येथे पोहोचतील, असे त्यांच्या निकटवर्तीय सूत्रांनी सांगितले.
एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक व विश्वासू समजले जाणारे संजय राठोड मंगळवारी ‘मातोश्री’वरील बैठकीत उपस्थित होते. त्यामुळे ते शिवसेनेतून बाहेर पडणार नाही, असा विश्वास त्यांचे समर्थक व्यक्त करीत होते. मात्र, राठोड यांनी पक्षातील बहुमताचा कौल स्वीकारत शिंदे यांचा हात धरल्याने जिल्ह्यात आता त्याचे काय पडसाद उमटतात, याकडे सर्वांचे लक्ष आहे. बाळासाहेबांचा कट्टर शिवसैनिक म्हणून राठोड गेल्या तीस वर्षांपासून सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात कार्यरत आहेत. शिवसैनिक, जिल्हाप्रमुख, आमदार, राज्यमंत्री ते मंत्री असा त्यांचा शिवसेनेतील प्रवास. आताही त्यांनी शिवसेना सोडली नाही, मात्र शिवसेना फोडणाऱ्या शिंदेंसोबत ते गेल्याने येत्या काळात जिल्ह्यातील राजकीय चित्र बदलण्याचे संकेत आहेत.
स्थानिक शिवसैनिकांनी मात्र या कठीण प्रसंगी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेनेचे जिल्ह्यातील तिन्ही जिल्हाप्रमुख अनुक्रमे पराग पिंगळे, राजेंद्र गायकवाड आणि विश्वास नांदेकर यांनी आज समाजमाध्यमांतून आम्ही या कठीण काळात शिवसेनेसोबत असल्याची भूमिका जाहीर केली आहे. यामुळे जिल्ह्यात शिवसेनेचे दोन गट समोरासमोर येण्याची दाट शक्यता आहे.