लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत सध्या जागावाटपावर चर्चा चालू आहे. दरम्यान, महाविकास आघाडीची बुधवारी (६ मार्च) महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला शिवसेनेच्या ठाकरे गटातील नेते, राष्ट्रवादीच्या शरद पवार गटातील नेते तसेच वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर आणि वंचितचे प्रतिनिधी उपस्थित होते. या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी प्रकाश आंबेडकर यांना बैठकीत झालेल्या चर्चेविषयी प्रश्न विचारला. त्यावर आंबेडकर म्हणाले, माझा चेहरा पाहून तुम्हाला काय वाटतंय? खरंतर आजच्या बैठकीत मनासारखी चर्चा झाली नाही. किंबहुना महत्त्वाची चर्चा झाली नाही. आंबेडकर यांच्या या वक्तव्यावर मविआतील प्रमुख नेते आणि शिवसेनेच्या ठाकरे गटातील खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
संजय राऊत म्हणाले, युतीत किंवा आघाडीत सर्वांच्या मनाप्रमाणे निर्णय होत नाहीत. आम्ही यापूर्वी शिवसेना भाजपा युतीत होतो. तेव्हाही आमच्या मनाप्रमाणे होत नव्हतं. आता आम्ही महाविकास आघाडीत आहोत. आताही तशा गोष्टी होतात. आघाडी धर्म टिकवण्यासाठी प्रत्येकाने सगळं काही आपल्याच मनाप्रमाणे व्हावं हा हट्ट सोडला पाहिजे. काँग्रेसने आपला अनेक जागांवरचा हट्ट सोडला आहे. त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेनेही बऱ्याच जागांवरचा हट्ट सोडला आहे. शिवसेनेने आपल्या अनेक महत्त्वाच्या जागा आघाडीत सोडल्या आहेत. कारण महाराष्ट्रात आम्हाला वेगळं चित्र निर्माण करायचं आहे.
संजय राऊत म्हणाले, महाविकास आघाडीत आमची प्रकाश आंबेडकर यांच्याशी अत्यंत उत्तम चर्चा झाली. आता काही जागांच्या संदर्भात पुढे चर्चा होईल. त्यामुळे काहीच घडलं नाही असं सांगणं बरोबर नाही. वंचितच्या बाबतीत आमची चर्चा खूप पुढे गेली आहे. वंचितने पुन्हा एकदा आमच्यासमोर एक प्रस्ताव ठेवला आहे. त्यावर आम्ही चर्चा केली, काही निर्णय घेतले. या गोष्टी वंचितच्या कार्यकारिणीसमोर मांडल्या जातील. कारण त्यांचा पक्ष लोकशाही मानणारा आहे. त्यानंतर त्यांच्या पक्षाकडून प्रस्ताव येईल आणि आम्ही त्यावर परत चर्चा करू. आम्ही प्रकाश आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडीचं पूर्ण समाधान करायचं ठरवलं आहे.
हे ही वाचा >> “केसाने गळा कापू नका”, शिंदे गटाचा भाजपाला इशारा; म्हणाले, “आमचा विश्वासघात…”
खासदार राऊत म्हणाले, प्रकाश आंबेडकर हे कोणत्याही परिस्थितीत प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे भाजपाला मदत होईल असं वागणार नाहीत. उत्तर प्रदेशात मायावतींनी जे काही चालवलं आहे तशी कृती प्रकाश आंबेडकर करणार नाहीत. मायावती या भाजपाच्या बी टीम असल्याची टीका नेहमीच केली जाते. याउलट देशात हुकूमशाहीला खतपाणी घालणारं मोदींचं राज्य नको अशी भूमिका प्रकाश आंबेडकर यांनी घेतली आहे. प्रकाश आंबेडकर यांना संविधानाचं रक्षण करायचं आहे आणि आमचीही तीच भूमिका आहे. त्यामुळे आम्ही एकत्र आहोत.