शिवसेना ( ठाकरे गट ) खासदार संजय राऊत यांनी नाशिकमधील ड्रग्ज प्रकरणावरून अप्रत्यक्षपणे पालकमंत्री दादा भुसे यांना लक्ष्य केलं आहे. नाशिकमधील ड्रग्जचे कारखाने उद्धस्त करण्यात आले. त्यामागे पालकमंत्र्याचं नाव येत आहे. एकतर महाराष्ट्राचा नायजेरिया किंवा केनिया करायचा आहे. किंवा ‘उडता नाशिक’ करायचं आहे, अशी प्रतिक्रिया संजय राऊतांनी व्यक्त केली आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
संजय राऊत म्हणालेत, “नाशिकमधील तरूण पिढी, शाळा-कॉलेजमधील मुलं-मुली ड्रग्जच्य विळख्यात सापडली आहेत. अनेकांची घरं उद्ध्वस्त होत आहेत. पोलीस, सरकार आणि पालकमंत्र्यांच्या संगनमतानं हे सर्व सुरू असल्याचं उघड होत आहे.”
“ड्रग्ज कुठून येतात, कुठं काय चाललं, कुणाचा सहभाग, हे पोलिसांना माहिती आहे. काही ठिकाणी पोलीसच याच्या व्यवहारात आणि व्यापारात सहभागी असल्याचं दिसत आहे. पोलिसांना नाशिकच्या पालकमंत्र्यांचा अभय आहे. ससून रूग्णालयातून पळालेल्या आरोपीच्या प्रकरणातही पालकमंत्र्यांचं नाव येत आहे,” असा आरोपही संजय राऊतांनी दादा भुसेंवर केला.
हेही वाचा : ललित पाटील कोण आहे? छोटा राजन गँगच्या गुंडांशी संपर्कात येत कसा झाला ड्रग माफिया?
“नाशिकमध्ये ड्रग्जचे कारखाने उद्ध्वस्त करण्यात आले. त्यातही पालकमंत्र्यांचं नाव येत आहे. एकतर महाराष्ट्राचा नायजेरिया आणि केनिया करायचा आहे. किंवा ‘उडता नाशिक’ करायचं आहे. पैसे, हफ्त्यांसाठी नितिमत्तेचं खालील टोक आपण गाठतोय, हे सध्याच्या राज्यकर्त्यांना कळत नाही,” अशी टीका संजय राऊतांनी केली आहे.