Maharashtra Karnatak Border Dispute : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरून राजकीय वातावरण चांगलेच तापलेलं आहे. अशात काल बेळगावजवळील हिरेबागवाडी येथे महाराष्ट्रातील वाहनांवर कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांकडून हल्ला करण्यात आला. याविरोधात सर्वच स्तरावरून संतप्त प्रतिक्रिया उमटत असतान खासदार संजय राऊत यांनी ट्वीट करत शिंदे-फडणवीस सरकारवर सडकून टीका केली आहे. दिल्लीच्या पाठिंब्याशिवाय बेळगावात मराठी माणूस व महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्ला होऊ शकत नाही, असा गंभीर आरोपही संजय राऊत यांना केला आहे.
हेही वाचा – “कन्नड रक्षण वेदिकेला काँग्रेसची फूस”, भाजपाचा गंभीर आरोप; म्हणाले, “महाराष्ट्र काँग्रेसचे नेते…”
नेमकं काय म्हणाले संजय राऊत?
“दिल्लीच्या पाठिंब्याशिवाय बेळगावात मराठी माणूस व महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्ला होऊ शकत नाही. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना अटक झाली आहे. महाराष्ट्राचा कणा मोडून मराठी स्वाभिमान कायमचा संपविण्याचा खेळ सुरू झाला आहे. बेळगावातील हल्ले त्याच कटाचा भाग आहे”, असा आरोप संजय राऊत यांच्याकडून करण्यात आला आहे.
“मुख्यमंत्री शिंदे म्हणतात, तीन महिन्यांपूर्वी आम्ही क्रांती केली. आता क्रांती दिसत आहे. महाराष्ट्र इतका लेचा-पेचा कधीच झाला नव्हता. यांनी तीन महिन्यात महाराष्ट्राचे दिल्लीच्या दारातील पायपुसणे करून टाकले आहे. स्वाभिमानी म्हणून शिवसेना सोडली, असे बोलणारे आज तोंडाला कुलूप लावून बसले आहेत. हा षंढपणा आहे”, अशी टीकाही संजय राऊत यांनी केली आहे.
बेळगावात महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्ला
दरम्यान, मंगळवारी दुपारी बेळगावजवळील हिरेबागवाडी टोल नाक्याजवळ कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांकडून महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्ला करण्यात आला होता. यावेळी एकूण सहा ट्रकवर शाईफेक आणि दगडफेक करत करण्यात आली. या हल्ल्याचा राजकीय पक्षांसह महाराष्ट्र सरकारकडूनही निषेध करण्यात आला होता.