खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र व खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले. श्रीकांत शिंदे यांनी ठाण्यातील गुंड राजा ठाकूर याला आपल्यावर हल्ला करण्याची सुपारी दिली आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला. राऊत यांच्या आरोपानंतर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

संजय राऊत यांना विनाकारण प्रसिद्धीची सवय लागली आहे. विनाकारण कुठला तरी आरोप करायचा आणि प्रसिद्धीत राहायचं. २ हजार कोटींचा आरोप केला. एक पुरावा त्यांच्याजवळ नाही. अलीकडे संजय राऊत एवढे बिनडोक आरोप करतात की काय उत्तर द्यायचं? रोज खोटं बोलल्याने सहानुभूती मिळत नाही. चुकीचे आरोप लावल्याबद्दल संजय राऊत यांच्यावर कारवाईची मागणी केली जाईल असं मला वाटतं आहे, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

या प्रतिक्रियेनंतर संजय राऊत यांनी फडवीसांना निशाणा साधला आहे. देवेंद्र फडणवीसांनी अतिशय बेजाबदारपणे उत्तर दिलं आहे. ते राज्याच्या गृहमंत्र्याला शोभत नाही. त्यांची नक्की काय सटकली आहे, हे माहीत नाही, अशा शब्दांत राऊतांनी टीकास्त्र सोडलं. ते नाशिक येथे पत्रकारांशी संवाद साधत होते.

हेही वाचा- संजय राऊतांच्या आरोपांवर अमृता फडणवीसांचा टोला; म्हणाल्या, “एखादं औषध…”

यावेळी राऊत म्हणाले, “देवेंद्र फडणवीस हे राज्याचे गृहमंत्री आहेत. त्यामुळे मी त्यांना एक पत्र लिहिलं. पण त्यांनी बेजबाबदारपणे उत्तर दिलं. एक गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस मला प्रचंड बेफिकीर दिसत आहेत. नक्की त्यांची काय सटकलीय, हे मला माहीत नाही. ते इतरांच्या बुद्धीची मापं काढतात. आम्ही त्यांच्या बुद्धीची मापं काढायला लागलो. तर जरा गडबड होईल. या महाराष्ट्रातील वरिष्ठ खासदार एक पत्र लिहितोय, त्यावर देवेंद्र फडणवीसांनी गांभीर्य न राखता जे विधान केलं आहे, ते राज्याच्या गृहमंत्र्याला शोभत नाहीये. ते एका गुंडाची बाजू घेत आहेत.”

हेही वाचा- “तुम्हीच मूर्ख आहात”, भरमंचावर शिवव्याख्याता खासदार अनिल बोंडेंशी भिडला, VIDEO व्हायरल

संजय राऊत पुढे म्हणाले, “मी ज्या एका कटकारस्थानाबद्दल माहिती दिली, त्यावर फडणवीसांनी बोलायला हवं होतं. किंवा त्यावर त्यांनी मौन राखायला हवं होतं. पण त्यांनी गृहमंत्रीपदाची प्रतिष्ठा न राखता, ते जे बोलत आहेत, त्यावरून ते गोंधळलेले आहेत, असं वाटतंय. त्या गोंधळाचा त्रास महाराष्ट्राला होत आहे. गेल्या दोन महिन्यात महाराष्ट्रातील अनेक लोकप्रतिनिधिंवर अशाप्रकारे हल्ले झाले किंवा हल्ला होण्याची भीती व्यक्त करण्यात आली.”

हेही वाचा- ‘मशाल’ चिन्हासाठी समता पार्टीचा उद्धव ठाकरेंना इशारा; म्हणाले, “बिहारहून आमचे सदस्य…”

“आज महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनीही मोठा खुलासा केला. त्यांनाही मारण्याचा कट रचला जात आहे. प्रज्ञा सातव यांच्यावरही हल्ला झाला. जितेंद्र आव्हाड यांना मारण्याची सुपारी दिली आहे, हे सगळं देवेंद्र फडणवीस गृहमंत्री असताना होतंय, हे त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे,” अशी प्रतिक्रिया संजय राऊतांनी दिली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanjay raut allegations about plot attack on him devendra fadnavis raja thakur rmm