विधान परिषदेच्या दहा जागांसाठी विधान भवनात मतदान सुरु आहे. महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षाचे तसेच भाजपाचे आमदार मतदान करत आहेत. काहीही झाले तरी या निवडणुकीत आमचेच उमेदवार निवडून येणार असा दावा प्रत्येकाकडूनच केला जातोय. असे असताना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी खळबळजनक विधान केले आहे. आमदार आपापल्या पक्षाच्या कँपमध्ये असतानादेखील दबाव, धमक्यांचे निरोप येत होते. आमच्या समोरसुद्धा हे घडले आहे, असं संजय राऊत म्हणाले आहेत.
हेही वाचा >>> विधान परिषद निवडणूक : ‘मिशीवाल्या मावळ्याचा बळी जाणार,’ अनिल बोंडे यांच्या सूचक ट्वीटमुळे चर्चेला उधाण
“महाविकास आघाडीचे तिन्ही पक्ष हातात हात धरून चालले आहेत. आम्हाला धोका आहे आणि समोरच्यांना नाही का? नाना पटोले यांनी तसेच आमच्या इतर प्रमुख नेत्यांनी जे सांगितले आहे त्यात तथ्य आहे. आमदार आपापल्या पक्षाच्या कँपमध्ये असतानादेखील दबाव, धमक्यांचे निरोप येत होते. आमच्या समोरसुद्धा हे घडले आहे,” असे संजय राऊत म्हणाले. तसेच या धमक्यांचा काहीही परिणाम होणार नाही. ही लोकशाही आहे. सध्या लोकशाहीला मालक निर्माण झालेले असले तरी या सर्वावर आम्ही मात करु. आजची निवडणूक नक्कीच महत्त्वाची आहे. तिन्ही पक्षाचे अधिकृत उमेदवार निवडून येतील, असे संजय राऊत म्हणाले. टीव्ही ९ मराठीने याबाबत सविस्तर वृत्त दिले आहे.
हेही वाचा >>> विधान परिषद निवडणूक : शिवसेना आमदारांच्या नाराजीवर विजय वडेट्टीवार यांचे महत्त्वाचे विधान, म्हणाले…
तसेच, “राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीची मतं महाविकास आघाडीलाच मिळाली. काही लोकांनी लबाडी केल्यामुले गडबड झाली असेल. पण विधान परिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी तसेच त्यांचे सर्व समर्थक आमदार एकजूट आहेत. तीन पक्षांची एकजूट किती आहे हे संध्याकाळी समजून येईल,” असे राऊत म्हणाले.
हेही वाचा >>> विधान परिषद निवडणूक : ‘…म्हणूनच त्यांनी पराभवाची स्क्रीप्ट अगोदरच तयार केली,’ चंद्रकांत पाटलांचा नाना पटोलेंना टोला
“महाविकास आघाडी एकजूट आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, नाना पटोले, बाळासाहेब थोरात या सगळ्यांचा एकमेकांशी संवाद सुरु आहे, अशी माहितीदेखील राऊत यांनी दिली.
हेही वाचा >>> “शिवसेनेचा ५६ वा वर्धापन दिवस किती उत्साहात…”; ‘हे’ चार फोटो पोस्ट करत निलेश राणेंनी शिवसेनेसहीत मुख्यमंत्र्यांना केलं लक्ष्य
दरम्यान, या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीची प्रतिष्ठ पणाला लागली आहे. राज्यसभेतील पराभवाचा वचपा काढण्याची संधी महाविकास आघाडीकडे आहे. आज एकूण दहा जागांसाठी मतदान होत असून निवडणुकीच्या रिंगणात एकूण ११ उमेदवार आहेत. त्यामुळे या निवडणुकीत कोणाचा पराभव होणार तसेच कोण सरस ठरणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.