शनिवारी (२३ जुलै) नवी मुंबई येथे पार पडलेल्या भाजपा राज्य कार्यकारणीच्या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर खरपूस टीका केली. विधानसभा निवडणुकीच्या अगोदरच राष्ट्रवादी आणि शिवसेनेने एकत्र येण्याचे ठरले होते. त्यावेळी मी त्यांच्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला. मात्र शिवसेनेकडून प्रतिसाद आला नाही, असा दावा फडणवीस यांनी केला. फडणवीसांच्या याच दाव्यावर शिवसेना खासदार संजय रांऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. असत्याला सत्याचा मुलामा देऊन कितीही गुळगुळीत करण्याचा प्रयत्न केला, तरी सत्य हे सत्य असते. आमच्या लाऊडस्पीकरसमोर तुमच्या पिपाण्या टिकणार नाहीत, असा खोचक टोला राऊतांनी लगावला आहे. एबीपी माझा या वृत्तवाहिनीने तसे वृत्त दिले आहे.
हेही वाचा >>> …मग शरद पवार नेमके कोणते? बाबासाहेब पुरंदरेंवरील टीकेनंतर ब्राह्मण महासंघांच्या नेत्याचा बोचरा सवाल
“हा खोटारडेपणाचा कळस आहे. माणूस किती बेमालूमपणे खोटू बोलू शकतो. असत्याला सत्याचा मुलामा देऊन कितीही गुळगुळीत करण्याचा प्रयत्न केला तरी सत्य हे सत्य असते. त्यामुळे भंपक गोष्टीकडे लक्ष देऊ नको. आमच्या लाऊडस्पीकरसमोर तुमच्या पिपाण्या टिकणार नाहीत. मराठी माणूस आज अस्वस्थ आहे. उद्धव ठाकरे यांचे सरकार पाडण्याचा प्रयत्न झाला. पाठीत खंजीर खुपसण्याचा प्रयत्न झाला. तुम्ही आम्हाला सत्य आणि न्यायाच्या गोष्टी सांगू नका,” असे संजय राऊत म्हणाले.
हेही वाचा >>> सोलापूरमध्ये बसचा भीषण अपघात, ३५ प्रवासी जखमी
देवेंद्र फडणवीस काय म्हणाले होते?
“निवडणुकीच्या काळात युतीचे उमेदवार निवडून आले पाहिजे म्हणून शिवसेनेला विरोध करणारे बंडखोर आपण मागे घेतले. त्यांना जी मदत करता येईल ती केली. मात्र शिवसेना आणि राष्ट्रवादीचे अगोदरच ठरले होते. तिघांनी एकत्र आल्यानंतर सरकार स्थापन होऊ शकते हे समजताच आमचे सर्व मार्ग खुले आहेत, असे ते म्हणाले. त्यांनी आमच्याशी चर्चाच केली नाही. मी फोन कॉल करत होतो. पण ते फोन घेत नव्हते. कारण त्यांचं ठरलं होतं,” असे देवेंद्र फडणवीस म्हणाले होते.
हेही वाचा >>>“विधानपरिषद निवडणुकीत एका पक्षाचे तीन आमदार २१ कोटी रुपयांमध्ये फुटले”; अमोल मिटकरींचा खळबळजनक दावा
“तो निर्णय घेऊन बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांशी फारकत घेण्यात आली. आज शिवसेनेवर जी परिस्थिती आली, त्याचे बिजारोपण त्या निर्णयामध्ये होते. बहुमत चोरून तयार केलेले सरकार टिकत नसते. हे सोईचे सरकार आहे, असे मी म्हणायचो. आज जनतेचे खरे सरकार आहे. बहुमताची चोरी झाली होती. हे बहुमत पुन्हा एकत्र आणले,” असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले होते.