ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेतील बंडखोर आमदारांना ४० चोर म्हणत चोरमंडळ असा उल्लेख केला. याविरोधात बुधवारी (१ मार्च) सत्ताधारी भाजपा आणि शिंदे गट आक्रमक झालेले पाहायला मिळाले. त्यांनी राऊतांविरोधात हक्कभंग प्रस्ताव आणला. यानंतर जोरदार गोंधळ झाला. यानंतर संजय राऊतांनी कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज येथे झालेल्या सभेत याला प्रत्युत्तर दिलं.
संजय राऊत म्हणाले, “मला पत्रकारांनी विधिमंडळातील गोंधळविषयी विचारलं. मी सांगितलं की, हे ४० चोर आहेत आणि त्या ४० चोरांनी आमच्या विधिमंडळाचं ‘चोरमंडळ’ करून टाकलं आहे. मी इथं बोललो आणि लगेच महाराष्ट्राच्या विधानसभेत माझ्याविरोधात ठणाठणा बोंबा मारणं सुरू झालं. आम्हाला चोर म्हटले असं म्हणत त्यांनी सभागृह बंद पाडलं.”
“चोरांना चोर नाही म्हणायचं, मग काय म्हणायचं?”
“विधानसभेत माझ्याविरोधात हक्कभंग आणला. माझ्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. मला तुरुंगात टाका, असं म्हटले. मात्र, चोरांना चोर नाही म्हणायचं, मग काय म्हणायचं?” असा प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थितांना विचारला.
“भाजपाने हाडूक टाकल्यावर ते हाडूक तोंडात पकडून पळून गेले”
संजय राऊत पुढे म्हणाले, “आम्हाला विधिमंडळाविषयी आदर आहे. आम्हाला विधानसभा, लोकसभेविषयी आदर आहे. मी स्वतः २० वर्षांपासून खासदार आहे. मला विधानसभा, लोकसभा काय हे माहिती आहे. मात्र, हे एका पक्षाच्या चिन्हावर निवडून आले, या शिवसैनिकांनी मरमर मेहनत करून यांना निवडून आणलं, बाळासाहेब ठाकरेंच्या नावावर निवडून आले, उद्धव ठाकरेंनी यांच्यासाठी रक्त आटवलं आणि भाजपाने हाडूक टाकल्यावर ते हाडूक तोंडात पकडून पळून गेले.”
हेही वाचा : VIDEO: बाळासाहेब ठाकरे आणि पत्नीच्या नात्याचा उल्लेख करत नितेश राणेंचा राऊतांवर गंभीर आरोप, म्हणाले…
“या चोरमंडळाला आपल्याला कायमचा धडा शिकवायचा आहे”
“या चोरमंडळाला आपल्याला कायमचा धडा शिकवायचा आहे. ते भित्रे आहेत. या ४० आमदारांपैकी किमान १५-१६ लोकांवर ईडी, सीबीआय, आयकर विभाग यांच्या कारवाया सुरू होत्या. नारायण राणेंच्या १०० बोगस कंपन्या आहेत. किरीट सोमय्या राणेविरोधात ईडी आणि कोर्टात गेला. तसेच यांना तुरुंगात टाकण्याची मागणी केली. मोदींनी राणेंना मंत्री करून टाकलं. आता किरीट सोमय्या बोलत आहेत का? तिकडे गेले आणि वॉशिंग मशिनमध्ये गेल्यासारखे स्वच्छ झाले,” असा आरोप संजय राऊतांनी केला.