महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने यंदा लोकसभा निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आगामी निवडणुकीत महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टी, शिवसेनेचा शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला बिनशर्त पाठिंबा दिला आहे. यावर शिवसेनेच्या ठाकरे गटाने राज ठाकरेंवर नाराजी व्यक्त केली आहे. महायुतीला पाठिंबा दर्शवताना राज ठाकरे म्हणाले होते, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कणखर नेतृत्वाला आम्ही पाठिंबा देत आहोत. यावर शिवसेनेच्या ठाकरे गटातील खासदार संजय राऊत म्हणाले, कणखर नेतृत्व म्हणजे काय? या कणखर नेतृत्वाने काश्मिरी पंडितांचा प्रश्न सोडवलाय का? पाकिस्तान आणि चीनबरोबरचा सीमावाद सोडवलाय का? मणिपूरचा प्रश्न, देशातील बेरोजगारीचा प्रश्न सोडवलाय का? भ्रष्टाचाऱ्यांना आपल्या पक्षात घेऊन मोदींनी नेमकं कोणतं कणखर नेतृत्व दाखवलं? मोदींनी घाबरवून, धमकावून आणि दहशत निर्माण करून भ्रष्टाचाऱ्यांना आपल्या पक्षात घेतलंय ही लोकशाहीसाठी गंभीर बाब आहे. त्यात आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भर पडली आहे. मोदींनी राज ठाकरेंनाही धमकावून पाठिंबा द्यायला लावलाय असं वाटतंय. कारण तोच मोदी आणि भाजपाचा स्वभाव आहे.

महाविकास आघाडीने गेल्या काही महिन्यांमध्ये महाराष्ट्रातील अनेक पक्षांना आपल्याबरोबर घेण्याचा प्रयत्न केला. वंचित बहुजन आघाडीला मविआत घेण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न केले. तसे प्रयत्न राज ठाकरे यांच्या बाबतीत केले नाहीत. याबाबत प्रश्न विचारल्यावर संजय राऊत म्हणाले, “आम्ही प्रयत्न केले नाहीत म्हणण्यापेक्षा समोरची व्यक्ती किती गंभीर आहे याला अधिक महत्त्व आहे. समोरची व्यक्ती राजकारणात गंभीर असावी लागते. राजकारण हा नुसता वेळ घालवण्याचा खेळ नाही. आपण महाराष्ट्र आणि देशातील जनतेबाबत ज्या भूमिका घेतो त्याला आपण चिकटून राहावं लागतं. आपल्याकडे एक विचारधारा असायला हवी. लढण्याची इर्षा, संघर्ष करण्यासाठी जिद्द असायला हवी.” संजय राऊत टीव्ही ९ मराठीशी बोलत होते.

हे ही वाचा >> राज ठाकरे यांच्या भूमिकेत कायमच सातत्याचा अभाव

संजय राऊत म्हणाले, मला वाटतं की, राज ठाकरे यांनी त्यांचा पक्ष स्वतंत्रपणे चालवण्याची भूमिका घेतली आहे. नरेंद्र मोदी, राज ठाकरे आणि इतर काही प्रमुख नेत्यांना वाटायचं की, एक अकेला सब पर भारी हैं (एकच नेता सर्वांपेक्षा उजवा आहे). परंतु, आता त्याच मोदींना ४०-४० पक्षांचं ओझं घेऊन निवडणूक लढावी लागतेय. राज ठाकरे यांनाही सुरुवातीला असंच वाटायचं. मी एकटाच सर्वकाही आहे, मी सर्वांना पुढे घेऊन जाईन असं राज ठाकरे यांना वाटायचं, आता तेच भाजपाबरोबर गेले आहेत. मागील वेळी (२०१९ ची लोकसभा निवडणूक) ते राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर होते, त्यांनी वेगळी भूमिका घेतली होती. अखेर मनसे हा त्यांचा पक्ष आहे आणि त्या पक्षाबाबत तेच निर्णय घेतात. आम्ही त्यांच्याबद्दल मत व्यक्त करू शकत नाही.

Story img Loader