शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे यांचा एक आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. याप्रकरणी शीतल म्हात्रे यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. यावरून शिंदे गट आणि ठाकरे गटात शाब्दिक युद्धही सुरू आहे. दरम्यान, या प्रकरणावर खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देत काही प्रश्न उपस्थित केले आहेत. ते दिल्ली पत्रकारांशी बोलत होते.
काय म्हणाले संजय राऊत?
“शीतल म्हात्रेंच्या व्हायरल व्हिडीओ प्रकरणी अनेक तरुणांना अटक केली जात आहे, हे अत्यंत चुकीचं आहे. हा काद्याचा गैरवापर आहे. मी दिल्लीत असल्याने ते प्रकरण नेमंक काय आहे, हे मला माहिती नाही. पण जो व्हिडीओ व्हायरल झाला आहे, तो व्हिडीओ खरा की खोटा हे आधी तपासलं पाहिजे”, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली.
“आमदार प्रकाश सुर्वे नेमके कुठं आहेत?”
“याप्रकरणी आमदार प्रकाश सुर्वे यांची काही तक्रार आहे का? हे तपासणं गरजेचं आहे. कारण सर्व प्रकरणात त्यांचीही बदनामी झाली आहे. बदनामी ही फक्त महिलांचीच होते, असं नाही. पण हे घडत असताना ते नेमके कुठं आहेत? ते शांत का आहेत?”, असा प्रश्नही राऊत यांनी विचारला.
“…मग त्याच्यासाठीही एसआयटी स्थापन करणार का?”
“शिंदे गटाच्या नेत्या म्हणतात, की त्यांची बदनामी सुरू आहे. जर त्यांची बदनामी होत असेल तर नक्कीच त्यांनी तक्रार दाखल करावी, पण एक व्हिडीओ व्हायरल होतो, लाखो लोकांपर्यंत पोहोचतो, मग या सर्वांवरच सरकार कारवाई करणार का? आणि अशा प्रकारे रोज महाराष्ट्रात कितीतरी प्रकरणं घडत असतात, त्याच्यासाठीही एसआयटी स्थापन करणार का?” असेही ते म्हणाले.
हेही वाचा – वैभव नाईकांची जिल्हाप्रमुख पदावरून उचलबांगडी; शिंदे गटात प्रवेश करणार? मुख्यमंत्री म्हणाले, “ते रोज मला…”
“…तर त्याला राजकीय कृतीने उत्तर दिलं जाऊ शकतं”
“कोणत्याही महिलेची बदनामी होऊ नये, त्यांचे शोषण होऊ नये, या मताचा मी आहे. सरकार कोणाचंही असो, महिलांचा सन्मान राखला गेलाच पाहिजे. पण काही गोष्टी राजकारण आणि सुड घेण्यासाठी केल्या जात असतील. तर त्याला राजकीय कृतीने उत्तर दिलं जाऊ शकतं”, असा इशाराही त्यांनी दिला.