Sanjay Raut on Chandrashekhar Bawankule : “नरेंद्र मोदींना विष्णूचा अवतार म्हटलेलं चालतं का?” असं म्हणत शिवसेना (ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी महसूल मंत्री व भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळेंवर पलटवार केला आहे. “श्रीकृष्णाची उद्धव ठाकरेंशी तुलना करणे हा वेडेपणा आहे”, असं बावनकुळे यांनी म्हटलं होतं. तसेच, “राऊतांना कोणी गांभीर्याने घेत नाही”, असंही ते म्हणाले होते. त्यावर आता राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. राऊत म्हणाले, “तुमचेच लोक मोदींना विष्णूचा १३ वा, १४ वा अवतार म्हणतात, ते चालतं का?”
संजय राऊत म्हणाले, “कोणीही कोणाचीही कोणाबरोबरही तुलना केलेली नाही. श्रीकृष्णाची असंख्य नावं आहेत. त्यात उद्धव हे देखील एक नाव आहे. आम्ही कधी बाळासाहेब ठाकरे यांची देवाशी तुलना केली नाही. मात्र, मोदींना विष्णूचा अवतार म्हटलेलं चालतं का? असा माझा प्रश्न आहे.” यावर उद्योग मंत्री उदय सामंत म्हणाले, “एकनाथ शिंदे यांना महादजी शिंदे पुरस्काराने सन्मानित केलं तेव्हा संजय राऊत यांना पोटशूळ का उठला? कोणाचीही देवाशी तुलना केल्याने देवपण येत नाही.”
वादात उदय सामंतांचीही उडी
उदय सामंत म्हणाले होते की “महाराष्ट्रातील तमाम वारकऱ्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पुरस्कार दिला, दिल्लीत संजय नाहर यांनी एकनाथ शिंदे यांना महादजी शिंदे पुरस्कार देऊन सन्मानित केलं. तेव्हा राऊतांच्या पोटात पोटशूळ का उठला होता असा माझा प्रश्न आहे. माझ्या मनात देवांबद्दल आदर आहे म्हणून मी कामातून वेळ काढून इथे आलो आहे. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा की देवाची उपमा दिल्यामुळे देवपण येत नाही. मी त्यांच्या (संजय राऊत) वक्तव्यावर टीका केली नाही. मला त्यांना एवढंच सांगायचं आहे की त्यांनी माहिती घेताना योग्य व्यक्तीकडून माहिती घ्यावी. तसं केल्यास त्यंना चुकीची माहिती मिळणार नाही.”
“मोदी विष्णूचे अवतार, ते अजैविक आहेत, त्यांना देवाने आकाशातून पाठवलं असं बोललेलं चालतं का?”
चंद्रशेखर बावनकुळे व उदय सामंतांच्या टीकेला उत्तर देताना संजय राऊत म्हणाले, “मला अजिबात पोटशूळ उठलेला नाही. मी अजिबात कोणाची तुलना केली नाही. मी तुलना केली म्हणणारे मुर्ख लोक आहेत. मात्र, मोदी विष्णूचे अवतार आहेत असं बोललेलं चालू शकतं, मोदी विष्णूचे १३ वे, १४ वे अवतार आहेत, ते अजैविक (नॉन बायोलॉजिकल) आहेत, त्यांना देवानेच आकाशातून पाठवलं असं बोललेलं चालतं का? मोदींची शिवाजी महाराजांशी तुलना करणे बावन्नखुळ्यांना चालत असेल, उदय सामंतांना चालू शकत असेल. मात्र, आम्ही कोणाचीही कोणाशी तुलना करत नाही.
कंगना रणौत यांच्याकडून मोदींची देवाशी तुलना
दरम्यान, बॉलिवूड अभिनेत्री आणि हिमाचल प्रदेशमधील मंडी जिल्ह्याच्या खासदार कंगना रणौत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. मोदी हे सामान्य नागरिक नसून ते ईश्वराचा अवतार आहेत असं कंगना यांनी म्हटलं आहे. यापूर्वी देखील कंगना यांनी मोदींची भगवान श्रीकृष्णाशी तुलना केली होती.