Sanjay Raut vs Eknath Shinde on Mahakumbh 2025 : उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथे भरवण्यात आलेल्या महाकुंभ मेळ्याची नुकतीच सांगता झाली. २६ फेब्रुवारीला म्हणजेच महाशिवरात्रीच्या दिवशी शेवटची तिथी होती. या दिवशी लोकांनी त्रिवेणी संगमावर जाऊन या कुंभ मेळ्यातलं शेवटचं शाही स्नान केलं. या कुंभमेळ्यात महिन्याभराच्या कालावधीत कोट्यवधी लोक सहभागी झाले होते. कोट्यवधी लोकांनी यावेळी शाही स्नान केलं. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील गेल्या आठवड्यात सोमवारी (२४ फेब्रुवारी) प्रयागराजला गेले होते. त्या दिवशी ते महाकुंभ मेळ्यात सहभागी झाले. तिथे त्यांनी शाही स्नान केलं. आता एकनाथ शिंदे यांनी राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांना कुंभमेळ्यात स्नान करण्यासाठी का गेला नाहीत असा प्रश्न केला आहे.
शिंदे यांच्या या प्रश्नाला शिवसेनेचे (ठाकरे) राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी उत्तर दिलं आहे. राऊत यांनी एक्सवर एक पोस्ट केली आहे. यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की एकनाथ शिंदे देखील कमाल आहेत. स्वतःला हिंदुत्ववादी म्हणणारे उद्धव ठाकरे कुंभ मेळ्यात का सहभागी झाले नाहीत असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. परंतु, शिंदेंनी हा प्रश्न राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांना विचारण्याची हिंमत दाखवायला हवी. भाजपाचा बॉस हिंदू नाही का?
उपमुख्यमंत्री काय म्हणाले होते?
एकनाथ शिंदे म्हणाले होते की“राहुल गांधी व उद्धव ठाकरे हे स्वतःला हिंदू म्हणवून घेतात. ते हिंदू आहेत तर मग ते महाकुंभमेळ्यात शाही स्नान करायला का गेले नाहीत? या लोकांच्या बोलण्यात आणि वागण्यात किती फरक आहे बघा. कुंभमेळ्यात कोट्यवधी लोकांनी स्नान केलं. पाण्यात डुबकी मारली आणि आपल्या श्रद्धा जपल्या. मग राहुल गांधी व उद्धव ठाकरे यांनी कुंभमेळ्यात जाणं का पसंत केलं नाही?”
केंद्रीय मंत्र्याची राहुल गांधी व उद्धव ठाकरेंवर टीका
केंद्रीय मंत्री गिरीराज सिंग यांनी देखील उद्धव ठाकरे व राहुल गांधींवर टीका केली होती. उद्धव ठाकरे हे वीर सावरकरांचा विरोध आणि निषेध नोंदवणाऱ्या राहुल गांधींना साथ देत आहेत. राहुल गांधी व उद्धव ठाकरे हे राजकारणात दिशा भरकटलेले लोक आहेत.