मालेगाव येथील रेणुकादेवी सहकारी सूतगिरीणी उभारणीसाठी नाशिक जिल्हा बँकेकडून घेतलेल्या कर्ज रकमेत घोटाळा केल्याप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यात शिवसेना ( ठाकरे गट ) उपनेते अद्वय हिरे यांना बुधवारी ( १५ नोव्हेंबर ) अटक झाली आहे. उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर पोलीस हिरे यांच्या मागावर होते. त्यानुसार बुधवारी पहाटे भोपाळ येथून नाशिक पोलिसांच्या गुन्हे शाखेने त्यांना ताब्यात घेतले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यावरून खासदार संजय राऊत यांनी शिंदे सरकार आणि मंत्री दादा भुसे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. “अद्वय हिरे यांची अटक राजकीय दबावतंत्रातून झाली आहे. पराभवाच्या भीतीनं मंत्री महोदयांनी शासकीय यंत्रणेचा गैरवापर करून अद्वय हिरे आणि कुटुंबीयांविरोधात ४० च्याआसपास गुन्हे दाखल केले आहेत,” असा आरोप संजय राऊतांनी दादा भुसेंवर केला आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.

संजय राऊत म्हणाले, “संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील प्रमुख नेते भाऊसाहेब हिरे यांचे अद्वय हिरे नातू आहेत. पण, अद्वय हिरे यांची अटक राजकीय दबावतंत्रातून झाली आहे. त्यांच्यावरील आरोप भाजपात असताना आणि त्याआधीही होते. पण, शिवसेनेत आल्यावर मालेगावात उद्धव ठाकरेंची सभा घेतली आणि मतदारसंघ ढवळून काढला. पराभवाच्या भीतीनं मंत्री महोदयांनी शासकीय यंत्रणेचा गैरवापर करून अद्वय हिरे आणि कुटुंबीयांविरोधात ४० च्याआसपास गुन्हे दाखल केले आहेत.”

हेही वाचा : ठाकरेंना ‘हिरे’ गवसल्याने शिंदे गटात अस्वस्थता

“दादा भुसेंवर काय कारवाई झाली?”

“गिरणा सहकारी साखर कारखान्याच्या शेअर्समध्ये १७८ कोटींची अफरातफर केल्याचा आरोप दादा भुसेंवर आहे. याबाबत ईडी, सीबीआय यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे. मग, दादा भुसेंवर काय कारवाई झाली?” असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केला आहे.

“भीमा-पाटस मनी लाँडरिंग प्रकरणी फडणवीसांकडे पुरावे दिले”

“भीमा-पाटस सहकारी साखर कारखान्यात ५०० कोटी रूपयांचं मनी लाँडरिंग झालं आहे. याबद्दल ईडी, सीबीआय आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पुरावे दिले. तिथे आजही शेतकरी आंदोलन करत आहे,” असे म्हणत संजय राऊतांनी राहुल कूल यांनाही लक्ष्य केलं आहे.

“…तेच अजित पवार गृहमंत्र्यांच्या मांडीला मांडी लावून दिल्लीत बसले होते”

“७० हजार कोटींचा शिखर बँक घोटाळा झाल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी सांगतात. ते अजित पवार आज मंत्रीमंडळात आहेत. तेच अजित पवार गृहमंत्र्यांच्या मांडीला मांडी लावून दिल्लीत बसले होते,” असं सांगत संजय राऊतांनी भाजपावर टीका केली आहे.

हेही वाचा : मालेगावात राजकीय वातावरण तप्त, भुसे व हिरे यांच्यातील वाद पेटला

“अद्वय हिरेंनी मालेगावची विधानसभा लढू नये म्हणून दबाव”

“हसन मुश्रीफ यांनी संत संताजी घोरपडे कारखान्यात घोटाळा केल्या आरोप भाजपाने केला. मुश्रीफ सध्या जामीनावर सुटले आहेत. ईडी, सीबीआयची प्रकरणे असलेली शिवसेनेची लोक सरकारमध्ये आहेत. या लोकांवर कुठलीही कारवाई होत नाही. पण, अद्वय हिरेंना अटक करून सरकारने दाखवून दिलं की आम्ही सुडाचं आणि दबावाचं राजकारण आहे. अद्वय हिरेंनी मालेगावची विधानसभा लढू नये, म्हणून दबाव होता. अद्वय हिरेंच्या पाठिशी संपूर्ण शिवसेना आहे,” असं संजय राऊतांनी सांगितलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanjay raut attacks bjp dada bhuse and shinde govt over advay hire arrest ssa
Show comments