निवडणूक आयोगाने मोठा निर्णय दिला आहे. शिवसेना पक्ष चिन्ह आणि नाव शिंदे गटाला देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे. या निर्णयामुळे उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे. यानंतर खासदार संजय राऊत यांनी सडकून टीका केली आहे. हवे तसे निकाल देण्यात येत आहेत. तीन महिन्यांपासून स्क्रिप्ट तयार आहे. अधिक खोके आणि भरवसा दिल्यानंतर शिवसेनेत फाटफूट घडवून आणली, असं टीकास्र संजय राऊतांनी सोडलं आहे.
“बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना नष्ट करुन बाजार-बुणग्यांच्या हातात पक्ष देण्यात आला आहे. मोदी-शाहांच्या भाजपाने ते करुन दाखवलं, पण महाराष्ट्र सूड घेतल्याशिवाय राहणार नाही. बाळासाहेब ठाकरेंनी रक्त आणि घाम गाळून शिवसेनेची बीज पेरली आणि आमच्यासारख्या अनेक पिढ्या उभ्या केल्या, ती शिंदेंची कशी होऊ शकते,” असा सवाल खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.
“हातात असलेल्या सत्तेच्या अमर्याद वापर करुन…”
“रामाचा धनुष्यबाण रावणाला देऊन निवडणूक आयोगाने काय सिद्ध केलं. ही लोकशाही आहे का? हे लोकशाहीच्या नावाने सुरु झालेलं अराजक आहे. उद्धव ठाकरेंनी सर्वांना आमदार, खासदार केलं. पण, भाजपाने हा नीच खेळ महाराष्ट्रात केला. हातात असलेल्या सत्तेच्या अमर्याद वापर करुन त्यांनी हा सूड घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, सूड ही दुधारी तलवार आहे. आज तुमच्या हातात तलवार आहे, उद्या ती आमच्या हातात येऊ शकते. हे विसरू नका,” असा इशारा संजय राऊतांनी दिला आहे.
हेही वाचा : “लोकशाहीला आदरांजली वाहून आम्ही बेबंदशाही..” उद्धव ठाकरेंचा निवडणूक आयोगाच्या निकालावरून मोदींना टोला
“फारतर तुम्ही तुरुंगात टाकणार, फासावर लटकवणार..”
“शिवसेनेसाठी बाळासाहेब ठाकरेंसाठी प्राण देणारे शिवसैनिक आजही आहेत. त्यांना तुम्ही कसं काय विकत घेणार. काय करणार फारतर तुम्ही तुरुंगात टाकणार, फासावर लटकवणार, आम्ही घाबरत नाही. महाराष्ट्राची जनता हळहळली आहे. त्यांच्या छातीत वेदनेचा सुरा खूपसला आहे. असं होणार होतं, आम्ही गृहीत धरून होतं,” असं संजय राऊतांनी सांगितलं आहे.
हेही वाचा : शिवसेना पक्ष, धनुष्यबाण शिंदे गटाला, आता पुढची रणनीती काय? उद्धव ठाकरे म्हणाले “आता आम्ही…”
“…ही भाजपाच्या अंताची सुरुवात आहे”
“बाळासाहेब ठाकरेंनी ५० ते ५५ वर्षापूर्वी पेरलेली बीज उपटण्याच काम भाजपा करत आहे. मोदी आणि शाहांचा भाजपा करतो. अडवाणी आणि अटलजी यांचा भाजपा म्हणत नाही. ही विषवल्ली आहे. त्यांना कौरवांचं राज्य आणायचं आहे. त्यासाठी ते कौरवांची सेना उभी करत आहेत. आम्ही कौरवांच्या बाजून नसल्याने त्यांनी आमच्यावर पाठीमागून केलेला वार आहे. आणि ही भाजपाच्या अंताची सुरुवात आहे,” असा हल्लाबोल संजय राऊतांनी केलेला आहे.