काँग्रेस हा महाराष्ट्रात मोठा पक्ष आहे. अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात हे वज्रमूठ सभेला उपस्थित होते. फक्त नाना पटोले हजर नव्हते. हे त्यांचे अंतर्गत विषय आहेत. नाना पटोलेंनी सांगितलं, सुरत आणि दिल्लीला गेल्याचं. त्यावर मी काय बोलणार, असं शिवसेना ( ठाकरे गट ) खासदार संजय राऊत यांनी सांगितले आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
संजय राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्ला केला. संजय राऊत म्हणाले, “बेईमानी आणि गद्दारीची बिजे गेल्या साडेतीन वर्षापासून रूजवली जात होती. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असतानाही बंडाचे प्रयत्न सुरू होते. तेव्हा हे लोक अहमद पटेल यांना भेटून पक्ष सोडण्याच्या तयारीत होते. अहमद पटेल यांच्याशी बैठकाही झाल्या होत्या. यांच्या डोक्यातील बेईमानीचा किडा हा जुना आहे.”
हेही वाचा : काँग्रेस नेत्याची शरद पवारांवर टीका, फडणवीसांचा राहुल गांधींवर हल्लाबोल; म्हणाले…
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पदवीवर प्रश्न विचारला असता संजय राऊतांनी सांगितले, “पंतप्रधानांची खोटी पदवी हे काय प्रतिष्ठेचे लक्षण नाही. अरविंद केजरीवाल यांच्यासह अनेक नेत्यांनी पंतप्रधानांची पदवी खोटी असल्याचं समोर आणले आहे. पंतप्रधान खोटे बोलत असून, खोटी पदवी दाखवत आहेत, हे चिन्ह चांगले नाही.”
हेही वाचा : “…तर अशाने देश गुलामच होईल”, संजय राऊतांचा ‘बुवाबाजी’वरून भाजपावर हल्लाबोल
एकनाथ शिंदे यांच्याबरोबर अयोध्या दौऱ्यावर भाजपा नेतेही गेले आहेत. याचा समाचार घेत संजय राऊतांनी म्हटलं, “धर्माच्या नावावर जे चालले आहे, आम्ही त्याच्या विरोधात नाही आहोत. आम्हीही अनेकवेळा अयोध्येला गेलो आहे. पण, भाजपाचे लोक कधी आमच्याबरोबर अयोध्येला आले नाही. बाबरी मशिद पडली तेव्हा भाजपावाले आम्हाला सोडून पळून गेले होते. आता गद्दारांचे बोट धरून अयोध्येला गेले आहेत,” असा हल्लाबोल संजय राऊतांनी केला आहे.