शिवसेना आमदारांच्या अपात्रतेबद्दल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडून होत असलेल्या दिरंगाईबाबत आज ( १३ ऑक्टोबर ) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी सर्वोच्च न्यायालयानं विधानसभा अध्यक्षांना सुनावलं आहे. विधानसभा अध्यक्षांना कुणीतर सांगावं की, हे प्रकरण गांभीर्यानं घेणं गरजेचं आहे. पोरखेळ करताय का? अशा शब्दांत सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी राहुल नार्वेकरांवर ताशेरे ओढले आहेत.
आता शिवसेना ( ठाकरे गट ) खासदार संजय राऊत यांनी राहुल नार्वेकरांना लक्ष्य केलं आहे. नाशिकमध्ये प्रसारमध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत म्हणाले, “विधानसभा अध्यक्ष खडेबोल सुनावण्याच्या योग्यतेचे आहेत, असं आम्हाला वाटतं. विधानसभा अध्यक्ष भारताचं संविधान, कायदा, नियम गांभीर्यानं घेत नाहीत. विधानसभा अध्यक्षांच्या ‘योग्यवेळी निर्णय घेण्या’च्या हेक्यामुळे महाराष्ट्राच्या छाताडावर घटनाबाह्य सरकार बसलं आहे. सर्वोच्च न्यायालय हेच वारंवार सांगतंय.”
हेही वाचा : “२०२४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर नरेंद्र मोदी पंतप्रधान राहणार नाहीत कारण..”, प्रकाश आंबेडकरांचा दावा
“सर्वोच्च न्यायालयानं ‘सौ सुनार की और एक लोहार की’ दिली आहे. यातून विधानसभा अध्यक्ष आणि त्यांच्या पालकांनी शहाणपणा घेतला तर बरे आहे. नाहीतर देशात न्यायव्यवस्था पायदळी तुडवत आहे, हे उघड होईल,” असा हल्लाबोल संजय राऊतांनी केला.
“घटनात्मक पदावर बसलेल्या व्यक्तीनं मर्यादा ठेवली पाहिजे”
“१० पक्ष फिरून बारा गावाचं पाणी पिणारे हे लोक आहेत. पक्षांतर आणि घटनाबाह्य सरकारबद्दल यांना कुठलीही काळजी नाही. दिल्लीच्या आदेशानं बेकायदेशीर सरकार वाचवायचं आहे. पण, घटनात्मक पदावर बसलेल्या व्यक्तीनं मर्यादा ठेवली पाहिजे,” अशा शब्दांत संजय राऊतांनी राहुल नार्वेकरांना सुनावलं आहे.
“न्यायालयानं विधानसभा अध्यक्षांच्या डोक्यात हातोडा मारला”
“सरकार जाण्याची वेळ आली आहे. अध्यक्षांनी सरकारला आयसीयूमध्ये ठेवून वाचवण्याचा प्रयत्न केला. पण, आता विधानसभा अध्यक्षांना आयसीयूमध्ये नेण्याची वेळ आली आहे. न्यायालयानं विधानसभा अध्यक्षांच्या डोक्यात हातोडा मारला आहे. विधानसभा अध्यक्षांनी स्वत:ची प्रतिष्ठा धुळीस मिळवली आहे,” असं टीकास्र संजय राऊतांनी सोडलं.
हेही वाचा : “…तर विधानसभा अध्यक्षांना दररोज आमदार अपात्रता सुनावणी घ्यावी लागणार”, उज्ज्वल निकम यांचं विधान
“विधानसभा अध्यक्ष दिल्लीत जाऊन आदेश घेऊन येतात अन्…”
“हे सरकार ७२ तासांत जाणार होतं. पण, विधानसभा अध्यक्ष दिल्लीत जाऊन आदेश घेऊन येतात आणि त्यानुसार निर्णय देतात. ‘योग्य वेळी योग्य निर्णया’चा अर्थ आम्हाला सांगू नये. तुमचाही ‘योग्य वेळी योग्य निर्णय’ आम्ही करू,” असा इशारा संजय राऊतांनी राहुल नार्वेकरांना दिला.