Sanjay Raut on MNS Raj Thackeray : उत्तर भारतीय विकास सेनेचे अध्यक्ष सुनील शुक्ला यांनी राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेविरोधात सर्वोच न्यायालयात याचिका दाखल केली आहे. राज ठाकरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्यांच्या पक्षाची मान्यता रद्द करावी, अशी मागणी या याचिकेद्वारे शुक्ला यांनी केली आहे. “राज ठाकरे हे उत्तर भारतीय लोकांविरोधातील हिंसेला पाठिंबा देत आहेत. त्यामुळे त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करावा, तसेच त्यांच्या पक्षाची मान्यता देखील रद्द करावी, असं शुक्ला यांनी त्यांच्या याचिकेत म्हटलं आहे. शुक्ला यांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने स्वीकारली आहे.
महाराष्ट्रात मराठी भाषेची सक्ती व्हावी आणि व्यवहारात ही भाषा वापरली जावी यासाठी मनसेने आक्रमक आंदोलन सुरू केलं होतं. राज्यातील बँकांमध्ये मराठी भाषा वापरली जाते की नाही हे तपासण्याचे आदेश मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना दिले होते. त्यानुसार, मनसे कार्यकर्ते विविध बँकांमध्ये जाऊन मराठीचा आग्रह धरू लागले, तिथे मराठी भाषेत व्यवहार होत आहेत की नाही ते तपासू लागले.

या बातमीसह सर्व प्रिमियम कंटेंट मोफत वाचा

…तर सर्वात आधी भाजपाची मान्यता रद्द करावी : संजय राऊत

दरम्यान, मनसे कार्यकर्त्यांनी मराठीला विरोध करणाऱ्या काही बँक कर्मचाऱ्यांच्या कानशीलात लगावल्या. परिणामी उत्तर भारतीय विकास सेनेने राज ठाकरे यांच्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली आहे. मनसे धार्मिक द्वेष पसरवत असल्याचं या याचिकाकर्त्याचं म्हणणं आहे. यावर शिवसेनेचे (ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी आक्षेप घेतला आहे. राऊत म्हणाले, धार्मिक द्वेषाचा विषय असेल तर सर्वप्रथम भाजपाची मान्यता रद्द करायला हवी.

“भाजपाने देशात धर्मांधता पसरवली”

संजय राऊत म्हणाले, “धार्मिक द्वेष हा विषय असेल तर सर्वात आधी भारतीय जनता पार्टीची मान्यता रद्द करायला हवी. धार्मिक द्वेष. धर्मांधता पसरवण्याचं काम या देशात कोणी करत असेल तर ते काम भाजपा करतेय. भाजपाचे प्रचारक, कोणीतरी धीरेंद्र शास्त्री असं म्हणतात की कोणत्याही गावात मुसलमानाने राहता कामा नये. गावांमध्ये केवळ हिंदूंनी राहावं. अशा प्रकारची भाषा करणारे लोकही या देशात आहेत. ते बुवा देखील असंच म्हणतात आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्या बुवाच्या दर्शनाला जातात.”

शिवसेना (ठाकरे) खासदार संजय राऊत म्हणाले, “मोदी त्या बुवाचं दर्शन घेतात, त्याच्या कार्यक्रमांना हजेरी लावतात याचाच अर्थ मोदींची त्या शास्त्रीबुवांच्या म्हणण्याला मान्यता आहे. त्यामुळे हा धार्मिक द्वेषाचा मुद्दा असेल तर धार्मिक द्वेष पसरवला म्हणून सर्वात आधी भारतीय जनता पार्टीची मान्यता रद्द करायला हवी. पक्षाची मान्यता रद्द करण्यास भाजपापासूनच सुरुवात करायला हवी. मनसे वगैरे नंतरचे पक्ष आहेत.”

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanjay raut backs mns as ubvs petition supreme court to cancel raj thackeray party recognition asc