शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर भूखंड घोटाळ्याचा आरोप करत यामागे भाजपाच्या प्रमुख लोकांचा हात असल्याचा दावा केला. भाजपातील देवेंद्र फडणवीसांना मानणाऱ्या आमदारांचीच शिंदेंच्या भ्रष्टाचाराचं प्रकरण उघड व्हावं अशी इच्छा आहे, असंही राऊतांनी म्हटलं. तसेच तीन नेत्यांच्या नावांचा उल्लेख केला. ते गुरुवारी (२२ डिसेंबर) दिल्लीत माध्यमांशी बोलत होते.

संजय राऊत म्हणाले, “नागपूरच्या १६ भूखंडाचं प्रकरण साधं नाही. गरिबांच्या घरांसाठी राखीव भूखंड १०० कोटी रुपयांपेक्षा अधिक व्यवहार करून मर्जीतील बिल्डरांना देण्यात आले. त्यावर प्रश्नचिन्ह आहे. ते प्रश्नचिन्ह आम्ही उभं केलेलं नाही. दीड महिन्यापूर्वी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आमदार प्रवीण दटके, नागोराव गाणार या विदर्भातील आमदारांनीच यावर तारांकित प्रश्न विचारला. तसेच चौकशीची मागणी केली.”

“एकनाथ शिंदेंचा भ्रष्टाचार बाहेर काढण्यात भाजपाच्या प्रमुख लोकांचा हात”

“तोच विषय आम्ही घेतला. याचा अर्थ स्पष्ट आहे की, एकनाथ शिंदेंच्या भ्रष्टाचाराचं प्रकरण उघड व्हावं ही भाजपातील देवेंद्र फडणवीसांना मानणाऱ्या आमदारांची इच्छा आहे. हे प्रकरण बाहेर काढण्यात भाजपाच्या प्रमुख लोकांचा हात आहे. ते कोण आहेत हे मला सांगण्याची गरज नाही,” असं म्हणत संजय राऊत यांनी फडणवीसांवर निशाणा साधला.

“बावनकुळे यांनीच या १६ भूखंडांविषयीचा प्रश्न विचारला”

संजय राऊत पुढे म्हणाले, “भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीच या १६ भूखंडांविषयीचा प्रश्न विचारला आहे. योगायोग असा आहे की, त्याआधी दोन दिवस नागपुरातील एका कार्यक्रमात बावनकुळे फडणवीसांच्या समोर सांगत होते की, मी प्रदेशाध्यक्ष असतानाच तुम्ही मुख्यमंत्री व्हा. त्यानंतर दुसऱ्या दिवशी भूखंड घोटाळ्याचं प्रकरण समोर येतं. याचा अर्थ सध्याच्या खोके सरकारने समजून घेतला पाहिजे.”

“महाराष्ट्रात आणि दिल्लीत पडद्यामागे काय सुरू आहे हे आम्हाला माहिती”

“आमच्यावर, शिवसेनेवर आरोप करण्यापेक्षा सरकारमध्ये अंतर्गत कलह सुरू आहेत, वाद सुरू आहेत त्यावर लक्ष द्यावं. आज भाजपाचे लोक तोंडदेखलेपणाने शिंदे गटाची बाजू घेत आहेत. मात्र, महाराष्ट्रात आणि दिल्लीत पडद्यामागे काय सुरू आहे हे आम्हाला माहिती आहे.”

हेही वाचा : “३२ वर्षांच्या तरुणाला खोके सरकार घाबरलं, त्यामुळे…”, आदित्य ठाकरेंचं शिंदे सरकार टीकास्त्र

“हे सरकार फेब्रुवारी महिना बघणार नाही”

“हे सरकार फेब्रुवारी महिना बघणार नाही हे मी वारंवार म्हणतो आहे. मी पुन्हा एकदा त्यावर ठाम आहे. हे भूखंड प्रकरण, १०० कोटींचा व्यवहार कोणी केला, या व्यवहाराचा साक्षीदार कोण आहे हे त्यांना माहिती आहे,” असंही संजय राऊतांनी नमूद केलं.

Story img Loader