राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात झालेल्या मोठ्या बंडखोरीनंतर त्याचे पडसात राज्याच्या राजकीय वर्तुळात उमटताना पाहायला मिळत आहेत. अजित पवार यांनी शिंदे-फडणवीसांना पाठिंबा देताना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली असून त्यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकूण ९ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. या सर्व ९ जणांवर अपात्रतेची कारवाई करणार असल्याचं पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितलं आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार व मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांनी एएनआयशी बोलताना मोठं विधान केलं आहे.
“हा देशाच्या लोकशाहीशी खेळ”
राज्यात जे घडतंय, तो लोकशाहीशी खेळ असल्याची प्रतिक्रिया संजय राऊतांनी दिली आहे. “तुम्ही फडणवीसांचं भाषण पाहा. अजित पवार जेलमध्ये ‘चक्की पिसिंग, छगन भुजबळ ‘चक्की पिसिंग’ म्हणत होते. आता हे कोण करणार? हा देशाच्या लोकशाहीशी खेळ चालला आहे”, असं संजय राऊत म्हणाले. “महाराष्ट्राची जनता आमच्याबरोबर आहे, आमच्यासोबत राहील”, असा दावाही त्यांनी केला.
“मी ऑन कॅमेरा सांगतोय की…”
दरम्यान, एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपदावरून हटवलं जाणार असल्याचा दावा संजय राऊतांनी केला आहे. “महाराष्ट्रात ही परंपरा कधीच नव्हती.आज मी ऑन कॅमेरा सांगतोय. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बदलतोय. महाराष्ट्राला नवीन मुख्यमंत्री मिळणार आहे. एकनाथ शिंदेंना हटवलं जाणार आहे. अपात्रतेच्या प्रकरणात एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदार अपात्र होणार आहेत. म्हणून अजित पवारांना घाईगडबडीत सोबत घेतलंय. अजित पवार मुख्यमंत्री बनणार आहेत”, असं संजय राऊत म्हणाले.
देशाच्या राजकारणाला मोदी-शाहांचं हे देणं आहे. आयाराम-गयारामचं हे नवीन राजकारण आहे. पण जनता अद्दल घडवेल. सगळ्यांना माहिती आहे काय चाललंय. अजित पवारांनी तीन वेळा प्रयत्न केले होते. हे सगळं ईडीचं राजकारण आहे. ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स दोन तासांसाठी आमच्या हातात द्या. आम्हीही महाराष्ट्र आणि देशाचं राजकारण बदलून टाकू”, असा दावा संजय राऊतांनी यावेळी केला.
“दोन दिवसांत अपेक्षित निर्णय होईल”, राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदाराचं सूचक ट्वीट; नेमकं काय घडणार?
“शपथविधीसाठी एक दिवस थांबता आलं असतं!”
“कालपर्यंत शरद पवार कुणाचेतरी गुरू होते. पण गुरू पौर्णिमेच्या मुहूर्तावर गुरूला दगा देण्यात आला. महाराष्ट्राच्या राजकारणात दगाबाजीचं राजकारण काही काळापासून सुरू झालं आहे. काल महाराष्ट्रात समृद्धी महामार्गावर अपघात झाला. निरपराध लोक जळून खाक झाले. त्यांच्या चिता जळत असताना घाईघाईत राजभवनावर शपथविधीचा सोहळा उत्साहात पार पडला. हे निर्दयीपणाचं लक्षण आहे. एक दिवस थांबता आलं असतं”, अशा शब्दांत संजय राऊतांनी रविवारच्या शपथविधीवर हल्लाबोल केला.
१० ऑगस्टपर्यंत १६ आमदार अपात्र ठरणार?
“अजित पवारांच्या शपथविधीचं नियोजन फक्त उपमुख्यमंत्रीपदासाठी नाही. पण त्यांच्या या निर्णयाचे दूरगामी परिणाम महाराष्ट्राच्या राजकारणावर होतील. अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याचा विक्रम प्रस्थापित केला आहे. पण यावेळी त्यांची डील मुख्यमंत्रीपदासाठी आहे. सध्याचे मुख्यमंत्री घरी जाणार आहेत. १६ आमदार अपात्र ठरणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी १० ऑगस्टपर्यंत करावीच लागेल. त्यासाठीच भाजपाने ही व्यवस्था केली आहे. अजित पवारांना उपमुख्यमंत्रीपद देऊन ती जागा भरून काढण्याचं काम काल झालं आहे”, असंही संजय राऊत यावेळी म्हणाले.