Sanjay Raut : विधानसभेची निवडणूक तोंडावर आलेली असल्यामुळे सर्वच राजकीय पक्ष जोरदार कामाला लागले आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात नेत्यांचे दौरे वाढले असून मतदारसंघाचा आढावा, बैठका, मेळावे, सभा असं चित्र सध्या पाहायला मिळत आहे. तसेच महायुती आणि महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला कसा असणार? याबाबतही चर्चा सुरु आहेत. अशातच आगामी विधानसभेसाठी महायुतीचा आणि महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रि‍पदाचा चेहरा कोण असणार? याबाबतही खलबतं सुरु आहेत. यातच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. अशातच आज शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्याबाबत सूचक भाष्य केलं आहे. विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात ठाकरे-२ सरकार येणार असल्याचा मोठा दावाही संजय राऊत यांनी केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

संजय राऊत काय म्हणाले?

“विधानसभेची निवडणूक घेण्याची त्यांची इच्छा नसली तरी त्यांना घ्यावी लागेल. निवडणूक आयोगाला उत्तर द्यावं लागेल. नोव्हेंबरमध्ये त्यांना विधानसभा अस्तित्वात आणावी लागेल. हरियाणा, झारखंड, जम्मू-कश्मीर आणि महाराष्ट्रातील निवडणुका त्यांना वेळेतच घ्याव्या लागतील. जसं घटनाबाह्य सरकार चालवलं जात आहे तसं निवडणुकींच्या तारखा मॅनेज करण्याचा प्रयत्न सत्ताधारी करतील. मात्र, महाराष्ट्रातील जनता आणि विरोधी पक्ष जागृत आहे, आणि आमचंही लक्ष आहे. विधानसभेची निवडणूक वेळेवर व्हायलाच पाहिजे, कारण आम्हाला खोकेवाल्यांचं सरकार घालवायचं आहे”, असं संजय राऊत म्हणाले.

हेही वाचा : Maharashtra News Live : “काँग्रेसकडे मुख्यमंत्रिपदाचा चेहरा…”, राऊतांचं सूचक वक्तव्य; नाना पटोलेंना म्हणाले….

राज्यात ठाकरे-२ सरकार येणार

“महायुतीला लोकसभेचा सर्व्हेही अनुकूल नव्हता आणि विधानसभेचाही नाही. आम्हाला कोणत्याही सर्व्हेची गरज नाही. कोणत्याही परिस्थितीत राज्यात ठाकरे-२ सरकार येणार, म्हणजे महाविकास आघाडीचं सरकार येणार, हे कोणीही थांबवू शकत नाही. मग त्यांनी निवडणुकीच्या तोंडावर कितीही घोषणा करूद्या. मग कितीही योजना आणा, पैशांचा धुरळा उडवा, मतदारांना विकत घेण्याचा प्रयत्न करा. पण निवडणुका तुम्हाला वेळेतच घ्याव्या लागतील”, असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

रवी राणांचा पराभव होणार

आमदार रवी राणा यांनी लाडकी बहीण योजनेवर बोलताना केलेल्या विधानावर बोलताना संजय राऊत म्हणाले, “त्यांच्या विधानाचा अर्थ असा आहे की, सरकारने या योजना जाहीर केल्या आहेत, त्या योजना लाडक्या बहि‍णींसाठी नसून त्या योजना फक्त मतं विकत घेण्यासाठी आहेत. मग हे पैसे त्यांच्या खिशातून आले का? तुम्ही पैसे काढून घेणारे कोण आहात? रवी राणा यांच्या पत्नी लोकसभा निवडणुकीत पराभूत झाल्या. त्यामुळे त्यांची मानसिकता तपासून घ्यावी लागेल, यावेळी रवी राणांचाही पराभव होणार आहे. योजनेचे पैसे परत घेऊ अशी भाषा अनेक आमदार आणि महायुतीचे नेते करत आहेत. मग हे पैसे त्यांचे आहेत का? या पैश्यावर जनतेचा हक्क आहे. १५०० रुपयांमध्ये घर चालत नाही आणि रवी राणा यांनी १५०० रुपयांमध्ये घर चालवून दाखवावं”, असं संजय राऊत म्हणाले.

गद्दार आमदारांचा पराभव होणार

“महाराष्ट्रातील सर्व गद्दार आमदार पुन्हा विधानसभेत दिसणार नाहीत. राज्यातील लाडक्या बहिणी त्यांचा पराभव करतील. आमदारांना ५० कोटी, खासदारांना १०० कोटी तर नगरसेवकांची किंमत ५ कोटी आणि आमच्या लाडक्या बहि‍णींसाठी १५०० रुपये देता का? तेही मते दिली नाहीत तर पैसे परत घेण्याची भाषा करतात”, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी महायुतीवर केला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanjay raut big statement to thackeray 2 government will come in the state after the assembly elections gkt