Sanjay Raut Brother : संजय राऊत म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मुलुखमैदान तोफ म्हणून ओळखले जाणारे खासदार आहेत. मात्र त्यांच्याच सख्ख्या भावाने म्हणजेच संदीप राऊत यांनी फेसबुकवर केलेली आणि त्यानंतर डिलिट केलेली पोस्ट चर्चेत आली आहे. संदीप राऊत यांनी सोशल मीडियावर ही पोस्ट केली. मात्र काही वेळातच ही पोस्ट डिलिट केली आणि त्यावर स्पष्टीकरण दिलं आहे.
काय आहे हे प्रकरण?
संजय राऊत यांचे सख्खे भाऊ संदीप राऊत अर्थात अप्पा राऊत यांनी एक फेसबुक पोस्ट लिहिली होती. या फेसबुक पोस्टमध्ये उतावीळांनाच डोक्यावर घेतलं जातं असा उल्लेख होता. दरम्यान ही पोस्ट अवघ्या काही वेळातच डिलिट करण्यात आली. मात्र संदीप राऊत यांच्या पोस्टचा स्क्रिन शॉट सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यानंतर संदीप राऊत यांना स्पष्टीकरण द्यावं लागलं आहे.
काय लिहिलं होतं संदीप राऊत यांच्या पोस्टमध्ये?
अलिकडे पक्षाशी एकनिष्ठ आणि प्रत्यक्ष फिल्डवर काम करणाऱ्या पारंपरिक शिवसैनिकांपेक्षा नेत्यांच्या पुढे पुढे करणाऱ्या नवं उतावीळांनाच डोक्यावर घेतलं जातं. हा मजकूर असलेली पोस्ट संदीप राऊत यांनी पोस्ट केली. जी काही क्षणांतच सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरली. ज्यानंतर ही पोस्ट डिलिट करण्यात आली. मात्र या पोस्टचे स्क्रिन शॉट व्हायरल झाले आहेत. ज्यावर संजय राऊत यांच्या घरात काही आलबेल नाही चाललंय का? असा प्रश्नही नेटकरी विचारत आहेत.
संदीप राऊत म्हणाले फेसबुक हॅक
माझं फेसबुक अकाउंट हॅक झाले होते. त्यामुळे ही पोस्ट माझ्या अकाउंटवर दिसली. आता मी रिकव्हर केले असून त्या पोस्टचा माझा काही संबंध नसून मी शिवसेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा एकनिष्ठ शिवसैनिक असून कोणीही त्याचा विपर्यास करू नये…असं संदीप राऊत यांनी म्हटलं आहे.
संजय राऊतांची केंद्र सरकारवर टीका
सत्ताधारी सभागृह चालू देत नाहीत. हे फार आश्चर्यकारक आहे. सभागृह चालू देण्याची जबाबदारी सत्ताधारी पक्षाची असते. गौतम अदाणी विषय हा कोणाचं व्यक्तिगत विषय नाही. अमेरिकेच्या न्यायालयाच्यानुसार आम्ही अडाणी मुद्यावर बोलायला उभे राहिलो तर आम्हाला बोलू देत नाहीत. आता जॉर्ज सोरेस वर सभागृह चालू देत नाहीत. भारताच्या इतिहासात अशा घटना कधी घडल्या नाहीत. विरोधी पक्षाची अवहेलना करायची ही कुठली लोकशाही आहे? राज्यसभा सभापती पक्षपातीपणा करत आहेत. आमच्याकडे अविश्वास ठराव मांडण्याशिवाय पर्याय नव्हता, असंही अविश्वास ठरवाबाबत संजय राऊत म्हणालेत.