माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे जळगाव जिल्हा दौऱ्यावर जाणार आहेत. येत्या २३ एप्रिलला उद्धव ठाकरे यांची जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे विराट सभा होणार आहे. माजी आमदार स्वर्गीय आर.ओ. पाटील यांच्या कन्या आणि ठाकरे गटाच्या नेत्या वैशाली सूर्यवंशी यांनी या विराट सभेचं आयोजन केलं आहे. या कार्यक्रमासाठी उद्धव ठाकरेंचं स्वागतच आहे, परंतु, संजय राऊतांनी या सभेत चौकटीत राहून बोलावं, अन्यथा सभेत घुसणार आहे, असं थेट आव्हान शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी. यावरून संजय राऊतांनीही त्यांना चोख प्रत्युत्तर दिलं आहे. ते आज मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
“आर.ओ. पाटील यांचे माझ्यावर फार उपकार होते. त्यांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यासाठी उद्धव ठाकरे येत आहेत. आर.ओ. पाटील यांचे उद्धव ठाकरे यांच्याबरोबर पहिल्यापासून संबंध होते. त्या प्रेमापोटी उद्धव ठाकरे येत आहेत.पुतळ्याचं अनावर करण्यासाठी येत असतील, तर जिल्ह्यात उद्धव ठाकरेंचं स्वागत आहे. पण, सभेत संजय राऊतांसारख माणूस माझ्यावर बोलत असेल, तर मी एसपींना पत्र देणार आहे, त्यांनी चौकटीत राहून बोलावं. अन्यथा सभेत घुसणार आहे,” असा इशारा गुलाबराव पाटलांनी दिला आहे.
गुलाबराव पाटलांच्या या वक्तव्यावर संजय राऊतांना आत पत्रकार परिषद प्रश्न विचारण्यात आला. “घुसा घुसा. तुम्ही आम्ही वाट बघत आहोत. घुसा आणि परत जाऊन दाखवा” असं प्रतिआव्हान राऊतांनी गुलाबराव पाटलांना दिलं आहे.
हेही वाचा >> “देवेंद्र फडणवीसांची माणुसकी मेली आहे का?” संजय राऊतांचा उपमुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल; उष्माघात प्रकरणावरून टीकास्र!
“हे फडणवीसांचं ढोंग आहे”
“खारघरमधील घटनेवर मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री बोलायला तयार नाहीत. मुख्यमंत्र्यांच्या तोंडाला तर बूच लागलं आहे. पालघरमध्ये जमावाने तीन साधूंची हत्या केली होती. त्यावेळी देवेंद्र फडणवीस आणि त्यांचा पक्ष डहाणूमध्ये ठाण मांडून बसले होते. त्यांनी याचं देशभरात राजकारण केलं. पण ज्या ५० श्रीसेवकांचा मृत्यू झाला, त्यांच्यासाठी फडणवीसांच्या डोळ्यात साधी सहानुभूतीही दिसत नाही. ज्या लोकांनी साधूंच्या हत्येनंतर छाती पिटली, ते लोक आज खारघरमधील ५० जणांच्या मृत्यूनंतर गप्प बसले आहेत. आता देवेंद्र फडणवीसांची माणुसकी मेली आहे का?” अशी टीकाही त्यांनी केली.