Sanjay Raut Slam BJP : शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे नेते संजय राऊत हे गेल्या काही दिवसांपासून शिवसेना (शिंदे) पक्षात फूट पडणार असल्याचा दावा करत आहेत. राऊतांनी काही दिवसांपूर्वी शिवसेनेत नवा उदय होणार असे विधान केले होते. सरकार स्थापन करताना मुख्यमंत्री पदावरून जेव्हा एकनाथ शिंदे रुसले होते, तेव्हाच हा उदय होणार होता. पण एकनाथ शिंदे सावध झाले, असं सूचक विधान राऊतांनी केलं होतं. आज पुन्हा राऊतांनी त्याचा उल्लेख केला आहे. इतकेच नाही तर राऊतांनी चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार या महायुती सरकारमधील नेत्यांचे पक्ष देखील फोडले जातील असे विधान केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“शिंदे गटात उदय होणार आहे. मला कोणाची नावं घ्यायची नाहीत. पण ज्या पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस आणि मूळ शिवसेना तोडण्यात आली. त्याच प्रमाणे अजित पवारांचा पक्ष तोडला जाईल आणि त्याच पद्धतीने एकनाथ शिंदे यांचा पक्ष तोडला जाईल. भारतीय जनता पक्षाला देशभरात पक्ष तोडण्याची चटक लागली आहे. फक्त इथे नाही, चंद्राबाबू आणि नितीश कुमार यांचा पक्ष देखील तोडला जाईल. यांच्या जि‍भेला रक्त लागलं आहे. जोपर्यंत ही चटक आहे, तोपर्यंत फोडा फोडीचं राजकारण सुरू राहिल”, असे खासदार संजय राऊत म्हणाले आहेत.

महापालिका निवडणुकीत मविआचं काय होणार?

महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडीतील पक्ष वेगवेगळे लढणार असल्याच्या मुद्द्यावर राऊतांनी यावेळी भाष्य केलं. “आज पुणे किंवा पिंपरी चिंचवड भागातील पदाधिकाऱ्याच्या बैठका आहेत. विधानसभा, लोकसभा निवडणूका संपल्या आहेत. लोकसभेत आम्ही जिंकलो, विधानसभेत पराभूत झालो. त्याची कारणं देशाला समजली आहेत. त्या पराभवाने खचून न जाता पुढील सर्व निवडणूका आम्हाला लढवाव्याच लागतील, त्यासाठी तयारी सुरू आहे. स्वबळाचा नारा दिलाय याचा अर्थ महाविकास आघाडी संपली किंवा तुटली असा काढता येणार नाही. हा विषय मुंबई पुरता आहे. मुंबई महाराष्ट्राची राजधानी आहे, त्या मुंबईवर अनेक वर्षांनी शिवसेनेचा पगडा आहे. शिवसेनेने इथे सातत्याने आपली पकड ठेवली आहे आणि ती तशीच ठेवायची असेल तर स्वबळावर लढलं पाहिजे असं कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. त्या कार्यकर्त्यांच्या भावना शिवसेना पक्ष प्रमुखांनी व्यक्त केली आहे, ही परिस्थिती इतर शहरात किंवा जिल्ह्यात असेल का याबद्दल साशंकता आहे. त्यामुळे तिथे तीनही पक्षांच्या नेत्यांचं म्हणणं आहे की एकत्र लढणं गरजेचं आहे, तिकडं त्या-त्या कार्यकर्त्यांच्या भूमिका लक्षात घेऊन आम्ही निर्णय घेऊ”, असे संजय राऊत म्हणाले.

महायुती सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पद स्वीकारण्याशिवाय एकनाथ शिंदेंकडे कोणताही पर्याय नव्हता असेही संजय राऊत यावेळी म्हणाले. “देवेंद्र फडणीस हे जेव्हा मुख्यमंत्र्‍याचे उपमुख्यमंत्री झाले, तेव्हा त्यांनी त्यांच्या हाय कमांडचा मान राखला. काही करून सत्तेत राहायचं ही या सगळ्यांची भूमिका आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते, त्यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढली गेली. असं म्हणतात की, त्यांना २०२४ मध्येही निवडणुकीनंतर तुम्ही मुख्यमंत्री राहाल असं सांगितलं होतं, तरी ते मुख्यमंत्री झाले नाहीत. तुम्हाला भारतीय जनता पक्ष जे तुमचं हायकमांड आहे, त्यांनी आदेश दिला आणि तुम्हाला स्वीकारावं लागलं. कोणाचा मान राखला म्हणणं तर्कसंगत नाही. देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या हायकमांडचा मान राखला, त्याच हायकमांडचा आदेश एकनाथ शिंदे यांना पाळावा लागला. त्यांनी जर उपमुख्यमंत्रीपद स्वीकारलं नसतं तर त्यांनी काय केलं असतं? त्यांच्याकडे पर्याय काय होतं? त्यांच्याकडे काही पर्याय नव्हता”, असे संजय राऊत म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanjay raut claim on ajit pawar ncp eknath shinde shiv sena with chandrababu naidu nitish kumar party also break bjp rak