शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्याच्या राजकीय वातावरणात खळबळ उडाली आहे. शरद पवारांनी राजीनामा मागे घ्यावा यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नेतेमंडळी त्यांची मनधरणी करत आहेत. त्यातच आता ठाकरे गटाकडून राष्ट्रवादी काँग्रेसमधला मोठा गट भाजपाच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे. यासंदर्भात टीव्ही ९ शी बोलताना ठाकरे गटाचे खासदार आणि मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांनी अजित पवारांबाबत सूचक विधान केलं आहे.
सामना अग्रलेखाची चर्चा!
आज सामनामधील अग्रलेखातून राष्ट्रवादी काँग्रेससंदर्भात मोठा दावा करण्यात आला आहे. “राष्ट्रवादी काँग्रेसमधील एक गट भारतीय जनता पक्षाच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचला आहे व राज्याच्या राजकारणात कधीही कोणता भूकंप होऊ शकतो असे वातावरण असताना पवारांनी राजीनामा देऊन धरणीकंप घडवला. पक्षातील ‘ईडी’सारख्या तपास यंत्रणांमुळे निर्माण झालेली अस्वस्थता व त्या अस्वस्थतेतून सहकाऱ्यांनी निवडलेला भाजपचा मार्ग हे कारण राजीनाम्यात आहे काय? अजित पवार व त्यांचा गट वेगळी भूमिका घेण्याच्या तयारीत असताना त्यांना अडवण्यासाठी पवारांनी हे पाऊल उचलले आहे काय?” असे सवाल उद्धव ठाकरे गटाकडून उपस्थित करण्यात आले आहेत.
संजय राऊत यांचं सूचक विधान!
“अजित पवार वारंवार सांगतायत की मी कुठेही जाणार नाही. अजित पवारांविषयीच्या या अफवांना पूर्णविराम दिला पाहिजे. पवार कुटुंबात एक नातं आहे. पण राजकारण वेगळं असतं. राजकारणात कधी काय घडेल, हे सांगता येत नाही”, असं विधान संजय राऊतांनी केलं आहे.
सुप्रिया सुळेंना अध्यक्षपद पेलवेल?
दरम्यान, सुप्रिया सुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष होऊ शकतात, अशी चर्चा चालू असताना त्यावरही संजय राऊतांनी भूमिका मांडली आहे. “शरद पवार, बाळासाहेब ठाकरे, इंदिरा गांधी ही या देशातली टोलेजंग व्यक्तीमत्व आहेत. त्यांचे वारसदार म्हणून त्यांच्या घरातून जेव्हा कुणी पुढे येतं, तेव्हा त्यांना ती उंची गाठता येत नाही. कारण ते एवढे महान व्यक्तीमत्व असतात. आपण त्यांची तुलना त्यांच्या वडिलांशी करतो हे चुकीचं आहे. उद्धव ठाकरेंची बाळासाहेब ठाकरेंशी तुलना होऊच शकत नाही. अजित पवार महाराष्ट्रात स्थिर आहेत. सुप्रिया सुळे दिल्लीत चांगलं काम करत आहेत. पण संसदेतली कामगिरी आणि राष्ट्रीय पक्षाचं प्रमुखपद स्वीकारल्यावर येणाऱ्या जबाबदाऱ्या पेलणं यात जमीन-आसमानाचा फरक असतो”, असं संजय राऊत यावेळी म्हणाले.
“राष्ट्रवादीतला एक गट भाजपाच्या उंबरठ्यापर्यंत”, पवारांच्या राजीनाम्याबाबत ठाकरे गटाचा मोठा दावा; म्हणे, “राज्यात कधीही भूकंप..!”
“आम्ही सध्या सामनात फार जपून भाष्य केलं आहे. पण हे खरं आहे. राष्ट्रवादीतल्या घडामोडींमुळे राज्यातलं राजकारण ढवळून निघालं आहे. शरद पवारांसारखा नेता काही राजकीय निर्णय घेतो, तेव्हा नक्कीत राज्याच्या राजकारणात खळबळ माजते”, असंही ते म्हणाले.