Sanjay Raut on Devendra Fadnavis oath ceremony : देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी (५ डिसेंबर) मुंबईतील आझाद मैदानावर आयोजित दिमाखादार सोहळ्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, उत्तर प्रदेशपासून आंध्र प्रदेशपर्यंत वेगवेगळ्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसह विविध राजकीय आणि मनोरंजन क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी मंचावर उपस्थित झाल्यानंतर ५ वाजून ३१ मिनिटांनी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रिपदाची शपथ देण्यात आली. फडणवीसांपाठोपाठ माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपद मिळावं यासाठी अनेक दिवस प्रयत्न केले. त्यानंतर त्यांनी गृहमंत्रीपद मिळावं यासाठी हट्ट धरला. मात्र भाजपाने त्यास विरोध केला. गृहमंत्रीपदाचा अद्याप निर्णय झालेला नसल्याचं सांगितलं जात आहे. मात्र एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळाबाहेर राहण्याचा देखील निर्णय घेतला होता. याबाबत त्यांच्याच निकवर्तीयांनी अनेकदा माहिती दिली आहे. मात्र, “एकनाथ शिंदे काल शपथ घेण्यास तयार झाले नसते तर भाजपाने त्यांच्याशिवाय फडणवीसांचा शपथविधी उरकला असता”, असा दावा शिवसेनेचे (ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
संजय राऊत म्हणाले, “एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घ्यावीच लागली कारण त्यांच्याशिवाय शपथविधी पार पाडण्याची तयारी भारतीय जनता पार्टीने आधीच केली होती. माझ्याकडे याबाबतची पक्की माहिती आहे. मी माहितीशिवाय बोलत नाही. कारण सरकारमध्ये आमची काही माणसं आहेत. राजकीय वर्तुळात आमचे काही हितचिंतक असतात आणि आहेत. त्यांच्या पक्षात व गटातही आमचे लोक आहेत. त्यामुळे आमच्याकडे सगळं असणार. ‘त्यांचा (एकनाथ शिंदे) खूप दबाव असेल तर त्यांच्याशिवाय पुढे जा’, असं भाजपाच्या दिल्लीतील पक्षश्रेष्ठींनी या खालच्या (महाराष्ट्रातील नेतृत्वाला) लोकांना कळवलं होतं.
संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
शिवसेनेचे (ठाकरे) खासदार म्हणाले, “महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद भूषवलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी नंतर उपमुख्यमंत्री म्हणून काम केलं. इतरही अनेक नेत्यांनी आधी मोठी आणि नंतर छोटी पदं स्वीकारली आहेत. अशोक चव्हाण हे पूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. मात्र, उद्धव ठाकरे यांच्या सरकारमध्ये त्यांनी मंत्री म्हणून जबाबदारी पार पाडली. शिवाजी पाटील निलंगेकर हे देखील आधी मुख्यमंत्री होते. नंतरच्या काळात त्यांनी मंत्री म्हणून कारभार पाहिला. मी त्याच्या फार खोलात जात नाही. मात्र एखाद्या माणसाच्या तोंडाला रक्त लागलं तर तो ती शिकार सोडत नाही, वर्षा बंगल्याची सवय झाली की तो बंगला सोडावासा वाटत नाही. उद्धव ठाकरे यांना जे जमलं ते सर्वांनाच जमत नाही. त्यांना जेव्हा जाणवलं की आपण आता बहुमत गमावलं आहे, त्याच क्षणी राजीनामा देत त्यांनी वर्षा बंगला सोडला. कारण त्यांना मोह नव्हता. म्हणूनच ते निघून गेले. सर्वांनाच हे काही जमत नाही. ज्यांना जमलं त्यांनी केलं. ज्यांना जमलं नाही त्यांनी आदळआपट केली”.