Sanjay Raut on Kunal Kamra : कुणाल कामरा येत्या ३१ मार्च रोजी मुंबई पोलिसांच्या चौकशीला सामोरा जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. याबद्दल शिवसेनेचे (ठाकरे) खासदार संजय राऊत म्हणाले, “कालच (२८ मार्च) माझं कुणाल कामराशी बोलणं झालं आहे. मी त्याला म्हणालो की आपण कायद्याला सामोरं गेलं पाहिजे.” यावर राऊत त्यांना विचारण्यात आलं की तुमचा कुणाल कामराशी संपर्क आहे का? त्यावर राऊत म्हणाले, “संपर्क नसायला तो काही अतिरेकी आहे का? तो देशद्रोही आहे का? तो अल-कायदा या दहशतवादी संघटनेचा सदस्य आहे का?”
एका बाजूला शिवसेनेचे (शिंदे) नेते आरोप करत आहेत की कुणाल कामराने ठाकरे गटाच्या सांगण्यावरून अथवा आदेशावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. अशातच, “माझं कुणाल कामराशी काल बोलणं झालं आहे”, असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं. यावरून प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी राऊत यांना विचारलं की तुमची मिलिभगत असल्याचा आरोप होतोय, त्याबाद्दल काय सांगाल? यावर राऊत म्हणाले, “कुणाल कामरा हा या देशातील एक कलाकार, कवी व लेखक आहे आणि एकनाथ शिंदे यांचा कुणाल कामरावर आक्षेप म्हणून आम्ही त्याच्याशी बोलायचं नाही का?”
कुणाल कामरा हा काय देशद्रोही आहे का? संजय राऊतांचा प्रश्न
संजय राऊत म्हणाले, “एकनाथ शिंदे यांचे कोणाकोणाबरोबर फोटो आहेत ते मी बाहेर काढू का? मुळात कुणाल कामरा हा काही देशद्रोही किंवा दहशतवादी आहे का? तो फुटीरतावादी आहे का? किंवा तो शिंदेंसारखा बेईमान किंवा गद्दार आहे का? नाही! काल कुणाल कमराशी माझं बोलणं झालं. त्याने मला काही गोष्टी विचारल्या, मी त्याला म्हटलं की आपण कायद्याला सामोरे जायला पाहिजे. हा देश राज्यघटनेवर चालतो, संविधानानुसार चालतो. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या या लढाईत असे हल्ले होत असतात. ते आपल्याला सहन करावे लागतात. आम्ही देखील ते सहन केले आहेत. तुम्ही सुद्धा महाराष्ट्रात येऊन कायदेशीर लढाई लढली पाहिजे.
…तरी एकनाथ शिंदे मोदी-शाहांच्या पायाशी बसलेत : संजय राऊत
खासदार संजय राऊत म्हणाले, “उद्या माझं पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणं होऊ शकतं. कारण माणसाने अशा भिंती उभ्या केलेल्या नाहीत. या महाराष्ट्रात किंवा देशात अशा भिंती उभ्या राहिलेल्या नाहीत. आम्ही कुणाशी बोलायचं, कोणाशी बोलायचं नाही याबद्दल शिंदेंच्या मताला काय किंमत? कुणाल कामरा हा एकनाथ शिंदे यांना शत्रू वाटू शकतो. म्हणून आम्ही त्याच्याशी बोलायचं नाही का? आम्हाला वाटतं की मोदी व शाह हे या महाराष्ट्राचे शत्रू आहेत. तरी देखील शिंदे हे मोदी-शाहांच्या पायाशी जाऊन बसले आहेत.”