Sanjay Raut on Varsha Bungalow Devendra Fadnavis : “उद्धव ठाकरे यांचं मुख्यमंत्रिपद गेल्यानंतर त्यांनी जेव्हा वर्षा बंगला सोडला तेव्हा त्या बंगल्यावर टोपलीभर लिंबं सापडली होती”, असं वक्तव्य शिवसेना (शिंदे) नेते रामदास कदम यांनी केलं आहे. यावर आता शिवसेनेचे (ठाकरे) राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी उत्तर दिलं आहे. राऊत म्हणाले, “ते रामदास कदम आहेत ते काही स्वामी रामदास नाहीत. कदमांच्या या असल्या वक्तव्याकडे प्रसारमाध्यमांनी लक्ष देण्याची आवश्यकता नाही. तसेच, काळ्या जादूबद्दल कोणी बोलू नये. कारण ती अंधश्रद्धा आहे. अशा प्रकारे कोणी अंधश्रद्धा पसरवत असेल तर त्यावर अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यांतर्गत कारवाई करायला हवी. यासह माझा प्रश्न असा होता की देवेंद्र फडणवीस वर्षा बंगल्यावर अद्याप राहायला का जात नाहीत? हवं तर कदमांनी याचं उत्तर द्यावं, भाजपा प्रवक्त्याने द्यावं”.
संजय राऊत म्हणाले, “देवेंद्र फडणवीस वर्षा बंगल्यावर जायला का घाबरत आहेत? त्यांचं कुटुंब का घाबरत आहे? वर्षा बंगल्यावर असं काय घडलं आहे की फडणवीस तिथे जायला घाबरतायत? हा संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेसाठी चिंतेचा व संशोधनाचा विषय आहे. मी कुठेही म्हटलं नाही की तिथे लिंबू-मिरच्या असतील. ‘वर्षा’ हा सरकारने मुख्यमंत्र्यांना दिलेला अधिकृत बंगला आहे आणि फडणवीस या बंगल्यावर जायला तयार नाहीत. त्यांना नेमकी कसली भिती वाटतेय? तिथे नेमकं काय घडलंय? की याआधी तिथे असणाऱ्यांनी घडवलंय? राज्यातील जनतेसाठी हा चिंतेचा विषय आहे”.
“वर्षा बंगला पाडून नवी इमारत बांधण्याचा घाट घातला जातोय”
शिवसेनेचे (ठाकरे) खासदार म्हणाले, “मी आयुष्यात पहिल्यांदाच पाहतोय की एक मुख्यमंत्री वर्षा बंगल्यावर जायला घाबरत आहेत. वर्षा बंगल्यावर राहायला जाणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. मात्र फडणवीस तिथे जात नाहीत. फडणवीसांचा पाय वर्षा बंगल्यावर पडत नाही. आमच्या अमृतावहिनींना देखील त्या ठिकाणी जावसं वाटत नाही. असं काय घडलं आहे की वर्षा बंगला पाडून तुम्ही नवीन बंगला बांधायचं ठरवलं आहे. माझ्याकडे खात्रीलायक माहिती आहे, म्हणून मी हा प्रश्न उपस्थित करतोय. संपूर्ण इमारत पाडून खोदकाम करून नव्याने तिथे बंगला उभा करायचा असं काहीतरी चाललंय.
उद्धव ठाकरेंनी गृहप्रवेश उशिरा का केलेला?
दरम्यान, काही वार्ताहरांनी प्रश्न उपस्थित केला की उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांनी देखील वर्षा बंगल्यावर उशिरा प्रवेश केला होता, त्याबद्दल काय सांगाल? त्यावर राऊत म्हणाले, “नवीन मुख्यमंत्री येतात तेव्हा ते त्यांच्या इच्छेने बंगल्याची रंगरंगोटी करतात, पूजा घालतात, त्यासाठी थोडाफार वेळ द्यावा लागतो”.